हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; अकोला मार्ग झाला ठप्प, हजारो वाहने अडकली
By विजय पाटील | Published: November 2, 2023 12:33 PM2023-11-02T12:33:33+5:302023-11-02T12:37:14+5:30
हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
हिंगोली : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याप्रमाणे आज हिंगोली - अकोल राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाट्यावर रास्ता रोको केला. यामुळे हजारो वाहने अडकून पडल्याचे दिसून येत होते.
हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. हिंगोलीतही सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक आमरण उपोषण केले जात आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हिंगोलीत तहसीलसमोर रेल्वे उड्डाणपुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याच मार्गावर पुढे बळसोंड येथे रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता रोको केला.
यात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर बासंबा फाट्यावरही राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने हजारो वाहने या ठिकाणी दोन्ही बाजूंनी अडकून पडल्याचे पहायला मिळाले. मागील दोन तासांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा वाढतच चालल्याचे पहायला मिळत आहे. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मान्यवरांकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणे कसे गरजेचे आहे, हे मांडण्यासाठी भाषणेही केली जात आहेत.