वसमतमध्ये चोरट्यांनी फायनान्स कंपनीची तिजोरी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:18 PM2018-04-03T19:18:17+5:302018-04-03T19:18:17+5:30
शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली.
वसमत (हिंगोली) : शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरी केली. चोरट्यांनी तेथील रोख रक्कम चोरलीच यासोबत तेथील अवजड तिजोरीच चोरून नेली. या तिजोरीत ४ लाख ७९ हजार रु. रोख रक्कम होती.
परभणी रोडवरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी कार्यालयात आले असता कार्यालयाचे शटर वाकलेले आढळले. पाहणी केली असता कार्यालयातील रोख रक्कम जमा करण्यासाठीची लोखंडी तिजोरीच गायब झाल्याचे आढळले. पोलिसांना पाचारण केले. डिवायएसपी शशिकिरण काशीद, पोनि उदयसिंह चंदेल यांनी पाहणी केली.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, चोरट्यांनी शटर वाकवून कार्यालयात प्रवेश केला. यानंतर तेथील अवजड लोखंडी तिजोरी एका पोत्यात टाकून ओढत खाली आणली व नंतर ती हातगाड्यावर टाकून परभणी रोडवर नेली. तेथे चारचाकी वाहनात टाकून पोबारा केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी वापरलेला हातगाड परभणी रोडवरील कृषी कार्यालयाच्या कॅनालजवळ सापडला. वजनदार लोखंडी तिजोरी चोरून नेण्याचा हा अजब प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक मनोज डुकरेच्या तक्रारीवरून ४ लाख ७९ हजार रु. चोरी झाल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोनि चंदेल हे करीत आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.