जेथे शिक्षणाचे धडे गिरवले, तिच शाळा फोडली; पोलिसांनी दहा वर्षानंतर ठोकल्या बेड्या
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 30, 2023 07:40 PM2023-07-30T19:40:14+5:302023-07-30T19:47:55+5:30
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉलरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते.
हिंगोली : जेथे शिक्षणाचे धडे गिरवले तीच शाळा फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना तब्बल दहा वर्षानंतर पकडण्यात पोलिसांना यश आले. 'कानुन के हात बहुत लंबे होते है' ही म्हणही या निमित्ताने खरी ठरली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व कॅनॉलरील विद्युत मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. विद्युत मोटारी चोरी जाण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या घटनांतील चोरटे हे कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तु. येथील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या नुसार पथकाने विक्रम उर्फ बंटी दत्तराव काळे, ज्ञानेश्वर भीमराव काळे, संकेत पुंजाराम कवाणे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फरार झालेले तिरूपती उर्फ बाळू किसन जाणकर, आकाश मेटकर, गजानन धोंडबाराव पतंगे यांच्यासह मिळून चार ठिकाणी विद्युत मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने अधिक तपास केला असता दहा वर्षापूर्वी गावातील शाळा फोडून चोरी केल्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून विद्युत मोटार व शाळेतील टीव्ही, दुचाकी असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
जेथे शिकले तेथेच मारला डल्ला
जेथे शिक्षण घेतले त्याच शाळेत चोरी करून मुद्देमाल लंपास केला. ही घटना २०१३ मध्ये घडली होती. दहा वर्षाचा कालावधी झाल्याने पोलिस आपल्यापर्यंत पोहचणार नाहीत, अशी समज चोरट्यांना होती. मात्र 'कानून के हात लंबे होते है' या म्हणीप्रमाणे पोलिसांनी तब्बल दहा वर्षानंतर शाळेतील चोरीचा उलगडा केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.
भंगार दुकानदारासही केले आरोपी
चोरटे हे विद्युत मोटार पंपची चोरी करून त्याची भंगार दुकानात विक्री करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंगार दुकानदाराला सुद्धा आरोपी केल्यामुळे चोरीची मोटार किंवा चोरीची मोटर सायकल घेणाऱ्या भंगार दुकानदाराचे धाबे दणाणले आहेत. कोणीही चोरीचे साहित्य खरेदी करू नये अन्यथा कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.