जलयुक्तला १६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:44 AM2018-09-02T00:44:23+5:302018-09-02T00:45:06+5:30
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांची काटेकोर तपासणी चालविली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामे घेवून ती थातूर-मातूर पद्धतीने आटोपण्याचा फंडा बंद झाला आहे. यात गतवर्षी अनेक ठिकाणची कामे सुरूच झाली नाही किंवा सुरू झाली तर ती अजून पूर्ण नाहीत. त्यातच वाळूची समस्याही अनेक कामांच्या मुळावर उतरली आहे. कृषी विभागामार्फत होणाऱ्या अनेक कामांत कंत्राटदारांनी बिलो दराच्या निविदा टाकून पुन्हा कामांना हात न लावल्याचे चित्र आहे. २0१७-१८ मध्ये एकूण २४७७ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी २४६९ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली होती. तर २४३0 कामांची निविदा प्रक्रिया झाली होती. यापैकी २३४0 कामांना कार्यारंभ आदेश दिला होता. यातील १९७५ कामे पूर्ण करून १३.२६ कोटींचा खर्च झाला. यात हिंगोली तालुक्यात २७२ कामांवर १.८४ कोटी, कळमनुरीत ३९८ कामांवर २.७0 कोटी, औंढ्यात ४२५ कामांवर ४.४५ कोटी, सेनगावात ४८५ कामांवर २.५५ कोटी तर वसमतला ३९५ कामांवर १.७२ कोटी खर्ची पडले. याशिवाय २५२ कामे प्रगतीत असून त्यावर ६.१८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यात ढाळीचे बांध १६८, खोल सलग समतल चरग१0१, शेततळे ३८९, वनतळे-२0, मातीनाला बांध ३१, साखळी सिमेंट बंधारे २५, नाला खोलीकरण, सरळीकरण- ३४५, गाळ काढणे- ६८, रिचार्ज शाफ्ट- २५५, ठिबक सिंचन-२३५, तुषार सिंचन ३३५ अशी कामे झाली आहेत. या योजनेत आराखडा ५८ कोटींचा होता. मात्र प्रत्यक्षात ३४ कोटींच्याच निविदा निघाल्या होत्या.
१0 गावे वाढली : जुनी कामेही सुरूच
२0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ गावे निवडली होती. यात २६७२ कामे प्रस्तावित असून ५१.२१ कोटींचा आराखडा आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने नव्याने १0 गावे वाढविली असून त्यांचेही आराखडे बनविले जाणार आहेत. यात २५६ कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाली असून १.२३ कोटींचा खर्च झाला आहे. सध्या जलयुक्त शिवार योजनेत १६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यात नवीन कामे तर करायचीच आहेत, जुनीही पूर्ण करायची आहेत.