हिंगोलीत ३ रुपयांचा मास्क १५ रुपयांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:42 PM2020-10-30T18:42:09+5:302020-10-30T18:43:12+5:30
शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री न केल्यास संबंधितांवर होणार कारवाई
- दयाशील इंगोले
हिंगोली : बाजारात चढ्या दराने मास्क विक्री हाेत असून ४९ रूपये दर असलेल्या एन-९५ मास्क तब्बल ९० ते १०० रूपये एवढ्या चढ्या दराने विकत आहेत. तर डिस्पाेजल मास्कही १० ते १५ रूपयांत विक्री हाेत असल्याचे ‘लाेकमत’ने २९ ऑक्टाेबर राेजी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये निदर्शनास आले.
हिंगोली शहरातील माेजक्याच मेडिकलवर शासनाच्या दरपत्रकानुसार मास्क विक्री केली जात आहे. काेराेना संकटाचा धाेका अजून संपला नाही. काेराेनाचा संसर्ग राेखता यावा, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. शासनाने एन ९५ तसेच दाेन व तीन पदरी मास्कचे दर निश्चित केले आहेत. परंतु या मास्कची चढ्या दराने विक्री होते.
नवीन निर्णयाची माहिती...
हिंगाेली शहरातील जवाहर राेडवरील एका मेडिकलवर गुरूवारी दुपारी ३ वाजता भेट दिली असता याठीकाणी एन ९५ मास्क ५० रूपये दराने विक्री हाेताना दिसून आले. तर तीन पदरी मास्क ६ रूपये व दाेन पदरी मास्क ५ रूपये दराने विक्री हाेताना दिसून आले. शासनाच्या दरपत्रकानुसारच आम्ही मास्क विक्री करीत आहाेत, असे औषधी दुकानचालकाने यावेळी सांगितले. शासन निर्णयाबाबत माहिती असून शासकीय दरानुसार मास्क विकत आहाेत ,असेही ते म्हणाले.
दर्शनी भागात नव्हता फलक...
हिंगाेली शहरातील महावीर स्तंभ परिसरातील एका औषधी दुकानावर दुपारी ३.४५ वाजता भेट दिली असता याठिकाणी एन९५ मास्क ८० ते९० रूपये दराने तर तीनपदरी १५ रूपये व दाेन पदरी मास्क १० रपये दराने विक्री हाेताना आढळुन आले. विशेष म्हणजे मास्क विक्रीचा बाेर्ड येथेही दर्शनी भागात लावला नसल्याचे आढळून आले. शिवाय शासन दरपत्रकानुसार मास्क विक्रीबाबत येथे बाेर्ड दिसून आला नाही. शिवाय नवीन शासनाच्या दरासंदर्भातही औषधी विक्रेत्यास माहिती मिळते.
दरपत्रकाबाबत माहितीच नाही....
हिंगाेली शहरातील माेंढा परिसरातील मेडिकलवर एन९५ मास्क ७० ते ८० रूपये दराने विक्री करताना दिसून आले. दाेन पदरी मास्क १० ते १५ तर तीन पदरी मास्क १५ ते २० रूपये दराने विक्री करताना आढळुन आले. शासनाच्या दरपत्रकाबाबत औषधी विक्रेत्यास माहिती नव्हती, शिवाय दर्शनी भागात मास्क दरपत्रकाचा फलकही लावलेला नव्हता. यावेळी मास्क खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांना वाटेल त्या किमतीनुसार मास्क विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
तर कारवाई करू
हिंगाेली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शासनाच्या दरपत्रकानुसारच एन९५, तीन व दाेन पदरी मास्कची विक्री करावी. हिंगाेलीत औषधी दुकानांची २८ ऑक्टाेबर राेजी तपासणी केली. परंतु जादा दराने काेणी मास्क विक्री करताना कोणी आढळले नाही. असे आढळल्यास कार्यवाही केली जाईल. - अन्न व औषध प्रशासन विभाग, बळीराम मरेवाड.