कुशल निधीचे ४.६७ कोटी रुपये थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:17 AM2019-03-05T00:17:52+5:302019-03-05T00:18:16+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत. यात काही ठिकाणी तर कामांवरही परिणाम होताना दिसत आहे. ग्रामपंचायतींनी अखर्चित रक्कम परत केली नसल्याने हा निधी थांबविल्याचे सांगितले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात पाणंद रस्ते, शेततळे, क्रीडांगण, सिमेंट नाला बांध, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, शौचालय, शोषखड्डे, रोपवाटिका, नाडेप कंपोस्ट आदी कामांसाठी मजुरीशिवाय साहित्यावरही खर्च करावा लागतो. यात काही कामे सार्वजनिक तर काही कामे वैयक्तिक लाभाची आहेत. सार्वजनिक कामांमध्ये ग्रामपंचायतींना कळ काढणे शक्य आहे. मात्र वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थी यात नाहक भरडले जात आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतींना दिलेल्या रक्कमेपैकी अखर्चित रक्कम शासन खाती जमा केली जात नसल्याने सरसकट लाभार्थ्यांची कुशलची देयके अडकून धरली आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता लाभार्थी नवीन कामे करायची की नाही? असा विचार करू लागली आहेत.
यंदा मग्रारोहयोत शासनाने दिलेल्या उद्दिष्टाएवढी कामे जानेवारीतच पूर्ण झाली आहेत. मात्र कुशलची देयके तेवढी बाकी आहेत. अजूनही इतर कामांचा जोरदार धडाका सुरू आहे. त्यामुळे अशा कामांमध्ये साहित्यासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम वाढतच चालली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच ४.६७ कोटी रुपयांची कुशलची देयके अडकल्याचे दिसून येत होते.
यामध्ये सर्वाधिक रक्कम हिंगोली तालुक्याची अडकली असून २.२४ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातून १.१८ कोटींची रक्कम थकल्याचे दिसून येत आहे. कळमनुरी तालुक्याचे ५८.३३ लाख, सेनगाव तालुक्याचे ३५.३२ लाख तर वसमत तालुक्यातील ३0.0९ लाख रुपये थकलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील काही भागातून कुशलची रक्कम देण्याच्या मागणीसाठी तक्रारीही प्राप्त होत आहेत. दुष्काळी परिस्थितीत अशाप्रकारे रक्कम थकल्यास कामे बंद पडणार असून त्यामुळे मजुरांना पुन्हा स्थलांतर करावे लागेल, असा तक्रारींचा सूर दिसून येत आहे.
कामनिहाय थकलेली ‘कुशल’ ची रक्कम
पाणंद रस्ते- २.११ कोटी
शेततळे-६.८४ लाख
वै.क्रीडांगण-५६ हजार
सिमेंट नाला बांध-६.७४ लाख
सिंचन विहीर-२.२३ कोटी
विहीर पुनर्भरण-१८ हजार
शौचालय बांधकाम-२.८९ लाख
शोषखड्डे-१.0२ लाख
रोपवाटिका-१३.९७ लाख
नोडपे कंपोस्ट-६२ हजार
तुती लागवड-00