हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ
By रमेश वाबळे | Updated: April 15, 2025 16:57 IST2025-04-15T16:56:18+5:302025-04-15T16:57:07+5:30
यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली.

हिंगोलीच्या जिल्हा बँकेत राडा; शेतकरी-कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारीने उडाला गोंधळ
हिंगोली : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत विड्राॅल देण्या- घेण्यावरून शेतकरी व बँक कर्मचाऱ्यांत फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. यात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचे डोके फुटले आहे, तर अन्य एक कर्मचारी आणि दोघा शेतकऱ्यांनाही दुखापत झाली. या घटनेमुळे बँकेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील आठवडाभरात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीकविमा, दुष्काळी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम काढण्यासाठी शाखेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मागील तीन दिवसांच्या सुट्यानंतर १५ एप्रिल रोजी बँक सुरू झाली. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच शेतकऱ्यांनी बँक परिसरात गर्दी केली होती, तर ११ वाजेच्या सुमारास रांग लागली होती. यादरम्यान बँकेच्या वतीने ७०० शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठीच्या पावतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर क्रमानुसार शेतकऱ्यांना खात्यातील रक्कम वितरित केली जात होती.
दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शेतकरी संजय रघू वाघमारे व चांदू रघू वाघमारे यांनी बँक कर्मचारी शेख मुनीर यांच्याकडे पैसे काढण्यासाठीची विड्राॅल पावती मागितली; परंतु अगोदरच ७०० शेतकऱ्यांना विड्राॅल दिला असून, आता थांबावे लागेल आणि गर्दी होऊ नये यासाठी बँकेच्या बाहेर थांबण्याचे शेख मुनीर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावरून शेतकरी व कर्मचाऱ्यात वाद उद्भवला आणि या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या शाखेत आणि शाखेबाहेर आणूनही मारहाण केल्याचे शेतकरी संजय वाघमारे व चांदू वाघमारे यांनी सांगितले. तर दोघा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्मचारी ओम काळे यांना दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले, तसेच शेख मुनीर यांनाही मारहाण केल्याचे बँक प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, हाणामारीच्या घटनेमुळे बँक शाखेत गोंधळ उडाल्याने ही माहिती शहर ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संजय वाघमारे व चांदू वाघमारे यांना पोलिस ठाण्यात नेले होते, तर जखमी ओम काळे यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.