सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही; जनतेने त्यांना मतदानातून धडा शिकवावा - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 08:56 PM2019-01-24T20:56:43+5:302019-01-24T20:57:18+5:30
केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही.
वसमत (हिंगोली ) : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे आता जनतेने सत्ताधाऱ्यांना मतदानाद्वारे धडा शिकवावा. आगामी निवडणूकीत परिवर्तन घडवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. वसमत येथे आयोजित परिवर्तन निर्धार सभेत ते मार्गदर्शन करत होते.
वसमत येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवतर्नाची निर्धार सभा घेण्यात आली. सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मार्गदर्शन करताना केंद्रात व राज्यात शेतीची व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची माहिती व जाण नसलेले लोक सत्तेत आहेत. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे मत व्यक्त करून आता त्यांना सत्तेवरुन खाली खेचण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात भाजप सरकारवर कडाडून टिका केली. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला अडीच वर्ष तुरूंगात डांबले. दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाचे बांधकाम दर्जेदार केले. चांगले काम करवून घेतले. शंभर कोटी रुपयांचे हे काम होते. त्या गुत्तेदाराला अद्यापपर्यंत एक रुपयाही सरकारने दिलेला नाही तरीही माझ्यावर ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा बिनबुडाचा आरोप केल्याचे छगन भुजबळ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनगर आरक्षणाचा शब्द सरकारने दिला होता. तो अद्याप पूर्ण केलेला नाही. पंतप्रधानांनी १५ लाख रुपये खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करून हे सरकार सत्तेवर आले असल्याचे सांगून आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धोंडीराम पार्डीकर यांनी केले. सभेस मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.