सत्ताधारी व विरोधकांकडे समान संख्याबळ असल्याने सेनगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:25 PM2017-10-14T17:25:50+5:302017-10-14T17:30:04+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता सुत्रे ताब्यात घेण्यासाठी राजकीय सघंर्ष चागलाच पेटला आहे. सत्ताधारी व विरोधी गटाचे समान संख्याबळा मुळे संचालक फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे.
सेनगाव ( हिंगोली) , दि. १४ : कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता सुत्रे ताब्यात घेण्यासाठी राजकीय सघंर्ष चागलाच पेटला आहे. सत्ताधारी व विरोधी गटाचे समान संख्याबळामुळे संचालक फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे. त्यामुळे सभापती पदी कुणाची वर्णी लागणार, सत्ताधारी आजी-माजी आमदार बाजार समितीची सत्ता कायम राखतात का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभापती व उपसभापतीची निवड सोमवारी (दि. १६ ) होणार आहे. १८ सदस्यीय बाजार समितीत मतदानास पात्र असणारी केवळ १२ संचालक पदावर कार्यरत आहेत. सध्या आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटिल गोरेगावकर गटाची बाजार समितीवर सत्ता आहे. अंतर्गत तडजोडी नुसार सभापती शंकर बोरूडे, उपसभापती संजय देशमुख यानी राजीनामा दिल्याने हे दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.
या निवड प्रक्रीये दरम्यान सत्ताधारी गटाच्या तीन संचालकावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. याने सत्ताधारी व विरोधी गटाचे संख्या बळ समान झाले असून बाजार समितीचा सत्ता सघंर्ष चांगलाच रंगात आला आहे. बाजार समितीत 7 संचालकाचा जादुई आकडा गाठण्यासाठी दोन्ही गटाच्या वतीने विरोधी संचालक आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
बाजार समितीमधील अंतर्गत तडजोड सत्ताधारी गटासाठी ऐनवेळी उदभवलेल्या परिस्थितीमुळे घातकी ठरु शकते. आजी-माजी आमदाराच्या तडजोडी नुसार सभापती पद हे माजी आमदार भाऊराव पाटील गटाकडे जाणार आहे. परंतु, माजी आमदार पाटिल गटाचे डॉ. निळकंठ गडदे, भाजपचे संचालक गोपाळराव देशमुख, कातराव कोटकर विरोधी गटाकडुन विनायकराव देशमुख, दत्तराव टाले यांची नावे सभापती पदासाठी चर्चीले जात आहेत. अशा कुरघोडीच्या राजकीय परिस्थितीत सभापती व उपसभापतीची निवड काही तासांवर आल्याने सर्वाचे लक्ष बाजार समितीच्या समिकरणाकडे लागले आहे.