बसस्थानक उद्घाटनाची घाई; सुविधा मात्र मागायच्या नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:02+5:302021-09-16T04:37:02+5:30

हिंगोलीत कामे रखडवत ठेवून पूर्ण करणे हा गुत्तेदारीतील नवा ट्रेंड आला आहे. जिल्हा प्रशासनही अशा कामांचा कधी आढावा घेत ...

Rush to bus station opening; But don't ask for facilities | बसस्थानक उद्घाटनाची घाई; सुविधा मात्र मागायच्या नाही

बसस्थानक उद्घाटनाची घाई; सुविधा मात्र मागायच्या नाही

googlenewsNext

हिंगोलीत कामे रखडवत ठेवून पूर्ण करणे हा गुत्तेदारीतील नवा ट्रेंड आला आहे. जिल्हा प्रशासनही अशा कामांचा कधी आढावा घेत नाही की, लोकप्रतिनिधींना त्याचे सोयरसुतक असते. मग कधीतरी उद्घाटनाची घाई करायची आणि सुविधा असोत की नसोत त्या कामांचे उद्घाटन करून टिमकी मिरवायची पद्धत सुरू झाली आहे. बसस्थानकाच्या बाबतीत तर आणखीच विचित्र अनुभव आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीच बसस्थानकाचे पूर्ण झाल्याचे ठरवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी या कामाचे उद्घाटन न झाल्यास उद्घाटनाचा इशारा दिला. प्रशासनाचीही भंबेरी उडाली. कागदोपत्री पूर्णत्वाचे जुगाड लावून परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटनही ठरले. मात्र, स्वच्छतागृहाची अनेक कामे पूर्णच नाहीत. शॉवर बंद, पाईपलाईनमधून पाणी येत नाही. सेफ्टिक टँकला आऊटलेट नाहीत. शिवाय त्यावर ठेवायला झाकणही नसल्याने आता फरशा ठेवण्याचा प्रयोग करताना काही कामगार दिसत होते. दरवाजे उघडत नाहीत. उघडले तर बंद होईनात. विद्युतीकरणाचीही तीच बोंब आहे. बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी टाकलेल्या पेव्हर ब्लॉकच्या दोन्ही बाजूंनी उद्यानासारखे गाजर गवत वाढलेले आहे. तर बस ज्या आवारात थांबणार आहेत, तेथे अजूनही चिखलच आहे. फलाटापासून सात ते आठ फुटांपर्यंत कालपासून मुरुम टाकला जात आहे. मात्र, या ठिकाणी डांबरीकरण न झाल्यास जुन्या तात्पुरत्या बसस्थानकात प्रवासी बसला काय किंवा नव्या बसस्थानकातील फरशीवर चिखल माखून तेथे बसला हे सारखेच आहे. या डांबरीकरणाची निविदा आता काढण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. तर या इमारतीचे तीन वेगवेगळे फाऊंडेशन हवे होते. कटर मशिनच्या साह्याने तसे दाखविण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे आज दिसून येत होते.

याबाबत विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, मी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठीच हिंगोलीत येत आहे. परिसरात डांबरीकरणाचे काम बसस्थानकासोबतच व्हायला हवे होते. मात्र, निधी अपुरा मिळाल्याने ते शक्य झाले नाही. आता त्याची निविदा काढणार आहोत.

आगारप्रमुख प्रेमानंद चौतमल म्हणाले, या बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्याबाबत तांत्रिक टिमच सांगू शकेल. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावरच कोणती कामे झाली की नाही, हे कळणार आहे.

Web Title: Rush to bus station opening; But don't ask for facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.