रस्त्यातील खड्ड्यांमुळे एस. टी. बसेस सोडतात अर्ध्या रस्त्यात साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:29 AM2021-02-10T04:29:52+5:302021-02-10T04:29:52+5:30
जिल्ह्यात एस. टी. महामंडळाचे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. सद्य:स्थितीत हिंगोली आगारात ५७ बसेस, ३७ कर्मचारी, ...
जिल्ह्यात एस. टी. महामंडळाचे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. सद्य:स्थितीत हिंगोली आगारात ५७ बसेस, ३७ कर्मचारी, वसमत आगारात ५५ बसेस, ३८ कर्मचारी आणि कळमनुरी आगारात ३० बसेस असून २६ कर्मचारी हे मेन्टेनन्ससाठी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील आगारांमध्ये २९ बसेस या दहा वर्ष पूर्ण केलेल्या आहेत. एस. टी. बसेसची देखभाल ही रोजच्या रोज केली जाते. एका बसेसला वर्षभरात मेन्टेन्ससाठी १ लाख ८३ रुपये खर्च येतो. एखादेवेळी एस. टी. बस रस्त्यात बंद पडली तर लगेच बस दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी पाठविले जातात.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांना दुसऱ्या बसेसने पाठविले जाते.
प्रतिक्रिया
प्रवाशांची काळजी लक्षात घेऊन रोजच्या रोज बसेसचे मेन्टेनन्स केले जाते. बसेसचे मेन्टेनन्स बाकी राहिले असेल तर बस आगाराच्या बाहेर सोडली जात नाही. बसेसचे मेन्टेनन्स यांत्रिकी पर्यवेक्षक सिद्धार्थ आझादे यांच्याकडेच आहे. रोजच्या रोज कामगारांकडून ते करुन घेतात.
-प्रेमचंद चौतमल, आगारप्रमुख, हिंगोली
रस्त्यात एस. टी. बंद पडण्याची कारणे
रस्त्यांवरील खड्डे, टायर फुटणे, टायर पंक्चर होणे, एखादा पार्ट निखळणे आदी कारणे रस्त्यात एस. टी. बंद पडण्याची आहेत. जास्त करुन रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एस. टी. च्या सर्वच पार्टस्ला इजा पोहचत असल्याचे चालक सांगतात.
दहा वर्षावरील २९ बसेस
जिल्ह्यात तीन आगार असून या आगारांतील बससेची संख्या १४२ एवढी आहे. आगारातील २९ बसेस या दहा वर्ष पूर्ण केलेल्या आहेत. साधारणत: कोणतीही बस दहा ते पंधरा वर्षापर्यत चालविता येते. यानंतर ती स्क्रॅपमध्ये काढली जाते, असे महामंडळाने सांगितले.
एस. टी. बसेसचे जास्त नुकसान हे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होते . २०२० मध्ये मटेरिअल खर्च हा ३ कोटी १२ लाख रुपये झालेला आहे. याचबरोबर कामगारांचा खर्च हा ५ कोटी २४ लाख झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारांचा कारभार हा हिंगोली जिल्हा स्वतंत्र झाला असला तरी परभणी हे विभागीय आहे. एका बसेसला वर्षभरात १ लाख ८३ हजार रुपये खर्च येतो. -मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, हिंगोली, परभणी जिल्हा