संत नामदेवांचा ७५४ वा जन्म सोहळा; नर्सीत ५००१ पणत्याने दिपोत्सव, दर्शनासाठी भाविकांची रिघ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 11:33 AM2024-11-12T11:33:25+5:302024-11-12T11:41:28+5:30
गावोगावच्या भाविकांनी पहाटे पांडुरंगाच्या लाडके भक्त संत नामदेवांच्या चरणी टेकविला माथा
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि. हिंगोली): मानवाच्या अंतकरणात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे पांडुरंगाचे लाडके भक्त थोर संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ७५४ वा जन्म सोहळा हिंगोली तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या संत नामदेवाचे जन्मस्थान म्हणून असलेल्या नर्सी येथे मंगळवारी कार्तिक प्रबोधिनी एकादशीला पहाटे पाच वाजेदरम्यान ५००१ पणत्या पेटवून दिपोत्सवाने भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संत नामदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी भल्या पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.
दर्शनासाठी लावलेल्या रांगेतून भाविकांमधून अशोक घोंगडे व वंदना घोंगडे (रा.बेलोरा) या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला. यावेळी. संस्थानचे सचिव द्वारकादास सारडा, भिकाजी कीर्तनकार, भागवत सोळंके, मगर महाराज,अंबादास गाडे, आदी संस्थानचे पदाधिकारी व जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने या जन्म सोहळ्यासाठी उपस्थित होते.
संत नामदेवाचा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी गत महिनाभरापासून नर्सीसह परिसरातील भाविक तयारी करत होते यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नर्सी येथे ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता १३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. बुधवारी जन्म सोहळ्यानिमित्त पहाटे श्री च्या समाधीची महापूजा, अभिषेक, आरती, भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम घेऊन हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने विठ्ठल नामाच्या जयघोषाने साजरा करण्यात आला. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांना रिसोड येथील भाविक परमानंद कोकाटे यांच्याकडून फराळाचे वाटप करण्यात आले.
मंदिर परिसरात दीपोत्सवाची केली आरास
पहाटे पहाटे मंदिर परिसरात, घाट परिसरात, हजारो पणत्या व मेणबत्या पेटवून दीपोत्सवाची आरास करण्यात आली. तसेच नामदेवाच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. तर मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये श्री संत नामदेव महाराज यांची रांगोळीतून आकर्षक प्रतीमा काढण्यात आली होती. नामदेवांच्या जन्मसोहळ्या निमित्ताने मंदिर परिसरात सकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.