जिल्ह्यात नोंदणी ६६५० आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीही तेवढ्याच प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:25 AM2021-01-14T04:25:28+5:302021-01-14T04:25:28+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील शासकीय व खासगी नोंदणीकृत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार असली, तरीही ६ हजार ...
हिंगोली : जिल्ह्यातील शासकीय व खासगी नोंदणीकृत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार असली, तरीही ६ हजार ६५० लसी प्राप्त झाल्या असून, या लसीचे दोन डोस दिले जाणार असल्याने ५० टक्केच कर्मचाऱ्यांना ही लस पुरेशी ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ६५० कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे एवढ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देणे अपेक्षित आहे. मात्र, प्राप्त झालेल्या लसींची संख्या पाहता, एका कर्मचाऱ्याला दोन डोस याप्रमाणे विचार केला तर ५० टक्केच लस प्राप्त झाली आहे. त्यामुळे ३ हजार ३२५ कर्मचाऱ्यांनाच ही लस देणे शक्य होणार आहे. दुसरी लस ४ ते ६ आठवड्यांनी द्यायची असल्याने तोपर्यंत नवीन लस आल्यास सर्व कर्मचाऱ्यांना लस देणे शक्य आहे. तूर्तास तरी नेमके कोणत्या पद्धतीने नियोजन करायचे, यावरून संभ्रम आहे. मात्र, या लसीकरणाबाबत आरोग्य विभाग उत्सुक दिसत असून, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम आदी नियोजन करत आहेत.
पहिल्या दिवशी ३०० जणांना लस
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाची तीन सत्रे होणार आहेत. हिंगोली, कळमनुरी व डोंगरकडा येथे ही सत्र होतील. प्रत्येक सत्रात १०० जणांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ३०० जणांना लस मिळणार आहे.
आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार ६५० लसी प्राप्त होणार आहेत. ज्या-ज्या दिवशी लसीकरण ठेवले आहे, त्या-त्या दिवशी या लसी तीन केंद्रांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या दिवशी तीन सत्र आहेत. त्यानंतर पुढील नियोजन केले जाईल. आज ही लस मिळणार असून, रात्री उशिरा हिंगोलीत दाखल होईल, असे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.