रस्त्यावर वाळूचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:29 AM2021-02-10T04:29:59+5:302021-02-10T04:29:59+5:30
गतिरोधक बसविण्याची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक ...
गतिरोधक बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमनुरी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील १५-२० दिवसापासून सतत खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांंना शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘जड वाहनांना प्रवेशबंदी करा’
हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागामध्ये जड वाहनांंना प्रवेशबंदी असतानाही जड वाहने सर्रास आणली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही यावर कारवाई होत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.
‘थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करावे’
हिंगोली : गत काही दिवसापासून किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदान्याचे पडदे लावणे गरजेचे आहे. पडदे लावल्यास पहाटेच्या थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.
किडीचा नायनाट करण्यासाठी फवारणीचा सल्ला
हिंगोली : वांगी, मिरची, भेंडी, कोबी व इतर पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी पायरीप्रॉक्झीफेम ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.
‘फुलामध्ये वेळच्यावेळी पाणीव्यवस्थापन करावे’
हिंगोली : फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणीव्यवस्थापन वेळच्यावेळी करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी वेळेवर करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.