हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:41 PM2023-02-19T16:41:38+5:302023-02-19T16:42:34+5:30

महसूलचे पथक पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रिकामी केली. त्यानंतर चालकाने व मजूराने पळ काढला. 

Sand mafia attack revenue team, one injured in hingoli | हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी

हिंगोलीत वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला, एक जण जखमी

Next

हिंगोली : अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. यात एक कर्मचारी जखमी झाला. ही घटना तालुक्यातील खांबाळा शिवारात १८ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आठ ते नऊ जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंद झाला. 

तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे यांच्या पथकाला खांबाळा शिवारातील नदीपात्रातून वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून मंडळ अधिकारी चाटसे,  तलाठी देविदास इंगळे, वैभव सोसे, हेमलता नाटकरयांचे पथक कारवाईसाठी खांबाळा शिवारात दाखल झाले. यावेळी एका ट्रॅक्टरमध्ये वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. महसूलचे पथक पाहताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रिकामी केली. त्यानंतर चालकाने व मजूराने पळ काढला. 

पथकाने ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली. थोड्या वेळाने अक्षय अशोक भूसांडे (रा. महादेववाडी हिंगोली) व सात ते आठ जण दाखल झाले. त्यांनी महसूलच्या पथकासोबत हुज्जत घालून पथकावर हल्ला केला. यात तलाठी देविदास इंगळे यांच्या पायास दुखापत झाली. याप्रकरणी मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे यांच्या फिर्यादीवरून अक्षय भूसांडे व इतर सात ते आठ जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.  पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे तपास करीत आहेत.

पंधरा दिवसांतील दुसरी घटना

जिल्ह्यात वाळूची अवैध उपसा  करून त्याची वाहतूक होत आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात कारवाईसाठी गेलेल्या पथकासोबत हुज्जत घालणे, हल्ला करणे असे प्रकार वाढले आहेत. मागील पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी हट्टा पोलिस ठाणे हद्दीत महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता.
 

Web Title: Sand mafia attack revenue team, one injured in hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.