वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पकडल्याने तीन तलाठ्यांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 02:08 PM2023-02-11T14:08:40+5:302023-02-11T14:13:33+5:30
तिघांनी ट्रक्टर थांबवून ट्रॅक्टर कसे काय घेऊन जाता असे म्हणून यातील दोघांनी तलाठ्यांना धक्काबुक्की केली.
औंढा नागनाथ ( हिंगोली) : अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याने तीन तलाठी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वाळू माफियाने ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना वसमत तालुक्यातील रांजाळा शिवारात १० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
औंढा तालुक्यातील आजरसोंडा सज्जाचे तलाठी विठ्ठल उत्तमराव शेळके व त्यांचे सहकारी आनंद तुकाराम काकडे (सज्जा उखळी), माधव बळीराम भुसावळे (सज्जा पिंपळदरी) हे तिघे १० फेब्रुवारी रोजी वसमत येथे जिल्हा संघटनेचा कार्यक्रम आटोपून कर्तव्यावर असताना दुचाकीने कॅनॉलमार्गे रांजाळा शिवारातून जवळा बाजारकडे निघाले होते. ४.५० वाजेच्या सुमारास एका सायपनजवळ त्यांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला. त्यामुळे त्यांनी चालकास वाळू वाहतुकीचा परवान्याबाबत विचारणा केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले.
तसेच ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रल्हाद वाघ (रा. नालेगाव) असे सांगितले. त्यानंतर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यासाठी घेऊन जात असताना समोरून एमएच ३८ व्ही ९८२४ एक चारचाकी जीप आली. यातील तिघांनी ट्रक्टर थांबवून ट्रॅक्टर कसे काय घेऊन जाता असे म्हणून यातील दोघांनी तलाठ्यांना धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टर चालक व मालकाने ट्रॅक्टर, ट्रॉली पळवून नेली.
याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तलाठी विठ्ठल शेळके यांच्या तक्रारीवरून गणेश विठ्ठलराव घुगे, नारायण रमेश नागरे (दोघे असोला ता. औंढा), प्रल्हाद वाघ याचेविरूद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे तपास करीत आहेत.