नक्षली हल्ल्यात हिंगोलीकरांचा संतोष शहीद तर भंडाऱ्यातील तिघांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:56 PM2019-05-01T21:56:35+5:302019-05-01T21:57:43+5:30
गडचिरोलीतील भ्याड हल्ल्याची बातमी फ्लॅश होताच, महाराष्ट्रावर शोककळा पसरली.
हिंगोली : राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांची गाडी भूसुरुंग स्फोटान उडवून दिली. या दुर्घटनेत 15 जवान शहीद झाले आहेत. त्यात, हिंगोलीचे भूमिपुत्र संतोष देविदास चव्हाण हे शहीद झाले आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील तीन जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे.
गडचिरोलीतील भ्याड हल्ल्याची बातमी फ्लॅश होताच, महाराष्ट्रावर शोककळा पसरली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारा, सोशल मीडिया काही तासांतच भावपूर्ण श्रद्धांजली अशा संदेशात रुपांतरीत झाला. शहीद संतोष चव्हाण यांच्या हिंगोलीतील औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील मूळ रहिवासी गावात ही बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली. शहीद संतोष देविदास चव्हाण 2011 मध्ये सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील दोन मुले असून एक 3 वर्ष तर दुसरा 3 महिन्यांचा मुलग आहे. तसेच वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
नक्षलवाद्यांच्या या भुसुरुंग स्फोटात भंडारा जिल्ह्यातील तीन जवान शहीद झाले. त्यात लाखनी येथील भूपेश पांडुरंग वालोदे, साकोली येथील नितिन तिलकचंद घोरमारे आणि लाखांदुर तालुक्याच्या दिघोरी मोठी येथील दयानंदभाऊ शहारे यांचा समावेश आहे.