सराफाला हातपाय बांधून लूटले; दागिन्यांसह सीसीटीव्हीचे फुटेज पळवणाऱ्या दोघाविरूद्ध गुन्हा
By यशवंत भीमराव परांडकर | Published: May 15, 2023 01:50 PM2023-05-15T13:50:09+5:302023-05-15T13:50:50+5:30
चोरट्यांनी सोने ४ लाख ८५ हजारांचे सोने तसेच डीव्हीआर अंदाजे किंमत ६ हजार असा एकूण ४ लाख ९१ हजार रुपयांचा माल लंपास केला.
- अरुण चव्हाण
जवळा बाजार (जि. हिंगोली) : येथील मुख्य रस्त्यावरील सराफाला लुटल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना १४ मे रोजी घडली होती.
पाथरकर ज्वेलर्स दुकानावर १४ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोरटे दुकानात शिरले होते. यावेळी दुकानदाराचे हातपाय बांधून सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. सराफाच्या फिर्यादीवरुन १५ मे रोजी हट्टा पोलिसात दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लग्न सराईमुळे मुख्य रस्त्यावरील पाथरकर ज्वेलर्स रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुख्य रस्त्याचे शटर बंद करून आतमध्ये सामानाची आवराआवरी करत होते.
यावेळी चोरट्यांनी सोने ४ लाख ८५ हजारांचे सोने तसेच डीव्हीआर अंदाजे किंमत ६ हजार असा एकूण ४ लाख ९१ हजार रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी रविकांत प्रभाकर पाथरकर यांनी हट्टा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलिस ठाण्यात दोन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार राजेश ठाकूरसह इतर कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली.