संक्रातीनंतर करीसाठी भाविक सारंग स्वामींच्या यात्रेत; १६० क्विंटल भाजीच्या प्रसादाचे वाटप
By यशवंत भीमराव परांडकर | Published: January 17, 2024 03:13 PM2024-01-17T15:13:19+5:302024-01-17T15:14:45+5:30
यात्रेतील प्रसादाची भाजी घेण्यासाठी काही भाविक मुक्कामी; सकाळी नऊ वाजेपासून सारंगवाडीत प्रसाद वाटप सुरू
- महेबूबखाँ पठाण
शिरडशहापूर (जि. हिंगोली): औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत बुधवारी एकत्र केलेल्या विविध भाजींचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. गावोगावच्या भाविकांनी भाजी यात्रा महोत्सवात सहभाग घेत सारंग स्वामी महाराजा यांच्या संजिवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भाजी यात्रा महोत्सवानिमित्ताने सारंगवाडी येथील देवस्थानच्या वतीने १0 जानेवारीपासून अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याची सांगता १७ जानेवारी रोजी करण्यात येऊन भाजी प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. या भाजी महोत्सवात हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, अकोला आदी जिल्हे तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील भाविकांनी सहभाग घेत भाजी प्रसादाचा लाभ घेतला. १६ जानेवारी रोजी काही भाविकांनी सारंगवाडी येथील देवस्थान परिसरात मुक्काम ठोकला होता. जवळपास १६० क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यासाठी मोठमोठ्या कढयांचा वापर करण्यात आला. औंढा तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातील सारंग स्वामी मठ संस्थानची यात्रा भाजीसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून हा सोहळा मकर संक्रांतीच्या करीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येत असतो.
सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप सुरु...
१६ जानेवारी रोजी रात्री भाज्या घेऊन अनेक भाविक दाखल झाले होते. रात्रीपासून भाजी प्रसाद तयार करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भाजी प्रसाद वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. भाजीचा प्रसाद भाविकांना व्यवस्थितरित्या मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापन समितीने ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. प्रत्येक भाविकाला भाजीचा प्रसाद मिळावा म्हणून स्वयंसेवक उभे करण्यात आले होते.
सर्व भाज्या केल्या एकत्र...
या भाजी महोत्सवात अनेक भाज्या एकत्र करुन त्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. यामध्ये वांगे, फूलकोबी, आलू, दोडके, कारले, मेथी, कोथिंबीर, काकडी, चवळी, गवार, भेंडी आदी विविध भाज्या एकत्र करुन त्या शिजविण्यात आल्या होत्या.