कारवाडीच्या मासिक सभेत सरपंचाच्या मुलास बदडले, उपसरपंचास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:21 AM2021-07-01T04:21:28+5:302021-07-01T04:21:28+5:30
याबाबत उपसरपंच कपिल शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कारवाडी येथे २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मासिक सभा ...
याबाबत उपसरपंच कपिल शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कारवाडी येथे २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मासिक सभा सुरू असताना सरपंच प्रियंका खरात, उपसरपंच कपिल शेवाळे, ग्रामसेवक व सदस्य हजर होते. तेव्हा ग्रा.पं.सदस्य रमेश जळबाजी वाघमारे, बालाजी अप्पाजी टोम्पे हे इतर दोन ते तीन अनोळखीं सोबत तेथे आले. त्यांनी सरपंच प्रियंका खरात यांचे पती शिवाजी यांना मार्च २०२१ च्या मासिक सभेस आम्हाला का बोलावले नाही, अशी विचारणा केली. त्यावर आमचे बहुमत असल्याने बोलावले नाही. तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवून घ्या, असे उत्तर दिल्याने बालाजी टोम्पे यांनी शिवाजी खरात यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांचा मुलगा ओमसाई याने माझ्या वडिलांना का मारले, तुमच्याविरुद्ध कार्यवाही करतो, असे म्हटल्याने बालाजी टोम्पेने त्यालाही जिवे मारण्याची धमकी दिली. सरपंच प्रियंका खरात भांडण सोडविण्यास गेल्या असता त्यांना रमेश वाघमारेने ढकलून दिले. तसेच कपिल शेवाळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तर इतर अनोळखींच्या मदतीने ओमसाई खरात यास जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
कारवाडी कायम चर्चेत
कारवाडी ग्रामपंचायत कायम चर्चेत असते. मागच्या वेळीही कारवाडीच्या महिला सरपंचांवर हल्ला झाला होता. तो का व कशासाठी झाला? हे कळालेच नाही. तो हल्ला त्यांच्या घरी असताना झाला? होता. आता तर थेट ग्रामपंचायतचे कार्यालयच भांडणाचे ठिकाण बनल्याचे दिसत आहे.