मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:54 PM2018-10-11T15:54:04+5:302018-10-11T17:31:00+5:30

सर्वोदय चळवळ आतापर्यंत जिवंत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

Sarvodaya Leader Gangaprasad Agrawal passed away | मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन

मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन

Next

वसमत (हिंगोली) : मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी, सर्वोदयी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल (९८) यांचे आज  निधन झाले. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ते बिनीचे शिलेदार होते. निजामाशी कडवी झुंज देणाऱ्या गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी आयुष्यात कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. 

नांदेड येथे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना वसमत येथे आणण्यात आले होते. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेरीस आज दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वास्तव्यास असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ मध्ये झाला. अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रीक तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

या दरम्यानच १९४२ च्या चले जाव आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात अग्रवाल यांनी उडी घेतली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. वसमत येथील झेंडा सत्यागृह, आजेगावचा संघर्ष, जंगल सत्यागृह या आंदोलनाचे अग्रवाल यांनी नेतृत्व केले. वसमत तालुक्यातील व हिंगोली- परभणी जिल्ह्यातील सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसह त्यांनी सशस्त्र लढाईत सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आजेगावचा रणसंग्राम त्यापैकीच एक आहे. या संग्रामात बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते.

मराठवाडा मुक्त झाल्यानंतर गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी महात्मा गांधींच्या विचाराचा प्रचार प्रसाराचा वसा घेतला. स्वदेशी चळवळ स्वावलंबन, सेंद्रीय शेती, खादी ग्रामोद्योगचा प्रचार प्रसार सजीव शेती, राष्ट्रसेवा दलाचे कार्य, भूदान चळवळ, दुष्काळाविरोधातील संघर्ष, शेतकरी स्वावलंबी करण्याची मोहीम, शेतकरी आत्महत्या विरोधातील चळवळ, पाणी आंदोलन आदी समाज सुधारणांच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. १९६२ व १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी शांती सेनेसाठी कार्य करुन निवार्सितांच्या छावणीमध्ये मदतकार्य करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. १९५३ मध्ये वसमतच्या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. मात्र राजकारणात त्यांचे मन रमले नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत लढ्यात उडी घेतली. योगाचा प्रचार, प्रसारही त्यांनी केला. निरोगी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणायचे. गांधींचा विचार आचरणात आणावा, हा त्यांचा आग्रह असायचा. मनगट, मेंदू व मनाचा विकास करणारी शिक्षण पद्धती असावी, ही त्यांची कायम भूमिका राहिली.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांत जागृती अभियान प्रारंभ केले होते. शेती परवडत नसल्याने शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही. जमिनीचा घसरणारा पोत, त्यामुळे उत्पादनात झालेली घट, त्यातून शेतीचे व शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या सभा शिबीरे त्यांनी देशभर घेतली. तरुण जागृत करण्यावरही त्यांचा भर होता. त्यासाठी तरुणांची संघटना त्यांनी उभी केली. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना समाज सेवेला जोडण्याचे कार्य केले.  

महात्मा गांधी, विनोबा भावे, गोविदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. या शिवाय बाळासाहेब भारदे पुरस्कार, मराठवाडाभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. कधीच भौतिक वादात न अडकता अखंडितपणे समाजसेवा करणारे स्वातंत्र्यसैनानी म्हणून त्यांची कायम ओळख राहणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात व हैद्राबाद मुक्तीसंग्रामात झुंजणाऱ्या गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी मृत्यूशीही कडवी झुंज दिली. मात्र अखेर ९६ व्या वर्षी हा लढवय्या सेनानी मराठवाड्याचा गांधी नावाचा तारा कायमचा निखळला आहे.

Web Title: Sarvodaya Leader Gangaprasad Agrawal passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.