सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:24 AM2018-07-21T00:24:02+5:302018-07-21T00:24:12+5:30
मुलींना वारंवार कमी लेखणे, शिकूनही चूल आणि मूल यातच रमणार असे म्हणून संधीच नाकारली जाते. त्यात काही निमित्त झाले की, शिक्षणाची वाट बिकट होते. मात्र ही काटेरी वाट निट करून सेनगाव तालुक्यातील जामदया येथील सावित्रीच्या लेकींनी जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे असल्याचे दाखवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : मुलींना वारंवार कमी लेखणे, शिकूनही चूल आणि मूल यातच रमणार असे म्हणून संधीच नाकारली जाते. त्यात काही निमित्त झाले की, शिक्षणाची वाट बिकट होते. मात्र ही काटेरी वाट निट करून सेनगाव तालुक्यातील जामदया येथील सावित्रीच्या लेकींनी जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे असल्याचे दाखवून दिले.
सेनगाव हा मानव विकास निर्देशांकासह मुलींच्या साक्षरतेत पिछाडीवर असलेला तालुका. त्यामुळे शासनाने या तालुक्यासाठी मानव विकास मिशनमध्ये विविध उपाय योजले आहेत. त्यात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून बसेसही सुरू केल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील जामदया येथील जवळपास २० मुलींना या बसचा लाभ होतो. १३६६ लोकसंख्येचे हे गाव. आठवीपर्यंतचीच गावात शाळा. त्या हत्ता, सेनगाव येथे मानव विकास मिशनच्या एसटी बसमधून शाळेत जातात. पंरतु जामदया ते हत्त्ता पाटी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आहे. या झाडांच्या फांद्या तोडण्याची तसदी कधीच कोणी घेत नाही. तर बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना त्या अनेकदा लागल्या तरीही कुणी त्याची फारसी दखल घेतली नाही. मात्र मानव विकासच्या बसवरील चालकाच्या डोळ्याला झाडाची फांदी लागली अन् ही बसच बंद झाली. त्यामुळे या २0 मुलींच्या शिक्षणाचा मार्गही खडतर बनला नव्हे, बंद पडला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारानंतर कुणीतरी दखल घेईल, मदतीला धावून येईल, असे या मुलींना वाटले. मात्र काहीच झाले नाही अन् त्यांनी स्वत: हातात विळा, कुºहाड घेत झाडांच्या फांद्या छाटल्या. शुक्रवारी या रस्त्यावर या मुली पूर्णवेळ श्रमदान करीत होत्या. शिक्षणासाठी या मुलींची ही केविलवाणी धडपड पाहणाºयांनीही आधी त्यांना मदत केली नाही. नंतर पालक व इतरांनीही या मुलींच्या जिद्दीला सलाम करीत मदतीचा हात पुढे केला. मात्र मुलींची ही धडपड बस सुरू झाल्याशिवाय फळाला येणार नाही.
हा मार्ग पाच किमीचा आहे. कालपर्यंत बिकट वाटणारा हा मार्ग आता या मुलींनी प्रशस्त केल्याने ग्रामस्थांकडूनही त्यांचे कौतुक होत आहे. तर मुलींच्या या प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांचे आता तोंडभर कौतुक करणारे बोलताना थकत नाहीत. प्रशासनानेही याकडे लक्ष देवून ही बस सुरू करणे तेवढेच अगत्याचे आहे.
पायपीट थांबवा : विद्यार्थिनींची आर्त
जामदया गावात मानव विकासच्या बसशिवाय इतर कोणतीच बस येत नाही. खाजगी वाहनांचा महागडा प्रवास मुलींना परवडणारा नाही. त्यातच वडहिवरा गावापर्यंत मानव विकासची बस येत असली तरीही जामदयापासून ते पाच किमीवर आहे. एवढ्या अंतराची पायपीटही मुलींनी केली. मात्र ही
पायपीट करण्यापेक्षा एवढेच श्रम वापरून झाडांच्या फांद्याच तोडल्या तर बसच गावात येईल, असा व्यवहार्य तोडगा या मुलींनी स्वत:च काढला. तर शुक्रवारी दप्तराऐवजी हातात कुºहाड, विळे घेत त्यावर अंमलही केला. आता बसची प्रतीक्षा आहे.
स्वत:साठी केले
हे आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर आमच्यासाठीच केले. काही करायचे तर बस तेवढी सुरू करा! अशी बोलकी व सुजान प्रतिक्रिया या मुलींनी देत प्रसिद्धीलोलुपांना एकप्रकारे चपराक दिली.