हिंगोलीतही पोलीस भरतीत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:22 PM2018-05-11T22:22:16+5:302018-05-11T22:22:16+5:30

नांदेड येथे पोलीस भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले होते.

Scam in Police recruitment in Hingoli | हिंगोलीतही पोलीस भरतीत घोटाळा

हिंगोलीतही पोलीस भरतीत घोटाळा

googlenewsNext

हिंगोली : नांदेडपाठोपाठ हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एकूण २६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तीन अधिकारी- कर्मचारी, तीन एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीचे आॅपरेटर तर उर्वरित भरतीतील उमेदवार आहेत. 

नांदेड येथे पोलीस भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले होते. तेथे तपासादरम्यान एसएसजी कंपनीच्या आॅपरेटर्सनी नांदेडातही याचप्रकारे २0 जणांची नियुक्ती केल्याची कबुली दिली. त्यानंतर हिंगोलीचे समादेशक योगेशकुमार व सहायक समादेशक तडवी यांनी चौकशी केली. त्यात तथ्य असल्याचे आढळून आले. एसएसजी कंपनीच्या लोकांना हाताशी धरून जयराम लोढाजी फुफाटे, नामदेव बाबूराव ढाकणे यांनी हा गोंधळ केला होता. शंभर गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना येतील एवढेच प्रश्न सोडविले होते. उर्वरित प्रश्नांच्या बरोबर उत्तरांच्या पर्यायाला गोल करून कंपनीच्या लोकांनी गुण वाढवून दिले होते. मात्र या उत्तरपत्रिकेत खालच्या बाजूने दुहेरी कार्बन होता, या बाबीचा संबंधितांना विसर पडला. त्यामुळे पडताळणीत ही बाब निदर्शनास आली. त्यांनी आधी गोल केलेल्या प्रश्नांच्या खालूनही कार्बनमुळे गोल झाला. मात्र कंपनीच्या लोकांनी तसे गोल केलेल्या प्रश्नांना असे गोल आढळले नाही. त्यामुळे हे बिंग फुटले. यात एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष बापूसाहेब ढाकणे, स्वप्नील दिलीप साळुंके, दिनेश गजभारे यांचा हात असल्याचे समोर आले. यामध्य २0१३ साली ४, २0१४ साली १0 तर २0१७ या वर्षी ६ जणांची अशा पद्धतीने निवड केली होती. याबाबत पोलिस निरीक्षक पुरभाजी माणिकराव मोरे यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त समादेशक जयराम लोढाजी फुफाटे, चालक नामदेव बाबूराव ढाकणे, एसएसजीचा ऑपरेटर शिरीष बापूसाहेब अवधूत, स्वप्नील दिलीप साळुंके, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा व २0 उमेदवारांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांनी सांगितले.

हे आहेत आरोपी उमेदवार

यामध्ये गोविंद बाबूराव ढाकणे, नीलेश बाबूराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्हाण, युसूफ फकीर शेख, मुनाफ फकीर शेख, संदीप केशव जुंबडे, उद्धव शिवराम धोतरे, अमोल विनोद जावळे, हरिभाऊ लक्ष्मण दुभाळकर, विश्वनाथ सदाशीव दळवे, सतीश विलासराव अंभोरे, सुभाष दशरथ रिठाड, किशन रामभाऊ  शिंदे, गोरखनाथ धोंडुजी कोकाटे, अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव भोरुडे, बाळकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे यांची बोगस गुणवाढीतून भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांवरही गुन्हा दाखल झाला.

प्रत्येकी ५0 हजार दिले ऑपरेटरला

या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक फुफाटे व इतरांनी किती रक्कम उमेदवारांकडून उकळली हे अजून कळाले नाही. मात्र एसएसजी सॉफ्टवेअर सांगली या कंपनीच्या आॅपरेटर्सनी प्रत्येकी ५0 हजार रुपये घेवून गुणवाढ केली होती. त्यांनी तशी कबुलीही दिली आहे. त्यामुळे आता खरा आकडा मुख्य सूत्रधारांना गजाआड केल्यावरच कळणार आहे.

सखोल तपास करू- चावरिया

या भरती घोटाळ्याबाबत आज गुन्हा दाखल झाला. त्याचा सखोल तपास करण्यात येईल. यात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिने तपास केला जाईल. यात कुणाचीही गय होणार नाही, असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले.
 

Web Title: Scam in Police recruitment in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.