Hingoli ZP सीईओंच्या दालनासमोर भरली शाळा; विद्यार्थ्यांनी वाचला असुविधेचा पाढा
By विजय पाटील | Published: December 7, 2022 03:37 PM2022-12-07T15:37:00+5:302022-12-07T15:37:38+5:30
शिक्षक दिले अन् परत घेतल्याने विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारात
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथील शाळा व्यवस्थापन समितीने शालेय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मुलांची शाळा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या दालनासमोरच शाळा भरविली.
या शाळेकडे जि.प. व पं.स.च्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष करून आमच्या मुलांचे भवितव्य अंधारात लोटण्याचे काळजीपूर्वक नियोजन केल्याचा आरोप केला. तर २०२०-२१ पासून अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक आहे का? शाळा दुरुस्ती रंगरंगोटी केली का? विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल दिला का? पाठ्यपुस्तकांचे वाटप केले का? ग्रंथालय, प्रयोगशाळा उपलब्धतेच्या नोंदी आहेत का? भाषा, गणित व इंग्रजी पेटी कुलुपबंद आहे त्याची जबाबदारी कोणाची? शाळा व्यवस्थापान समिती, माता पालक संघाच्या बैठका झाल्या का? त्याची नोंदवही आहे का? मुख्याध्यापक बनसोडे रजेवर गेल्यापासून शालेय साहित्य व इतर खर्च कसा भागतो? या काळात नागरिकांना निर्गम उतारा, बोनाफाईड दिला का? अशा प्रकारचे प्रश्न निवेदनात विचारून शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवेदनावर अमोल मोरे, शालिक मोरे, दीपक खनपटे, प्रवीण मोरे, विनोद खराटे, प्रकाश मोरे, देवराव मोरे, संभाजी मोरे, संतोष फड, संतोष चिचे, कानिराम मोरे, दीपक जाधव, मारोती जाधव, रमेश जाधव, रमेश खराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षक दिले अन् परत घेतले
या ठिकाणी कायमस्वरुपी एकच शिक्षक होता. आता नव्याने दोन शिक्षक देण्याचे आदेश दिले होते. मात्र ते रुजू झाले नाहीत. त्यांना मूळ शाळेवरच जाण्यास सांगितले. त्यानंतर मोरे नावाचे शिक्षक आले. मात्र त्यांना कोणतेच आदेश नसताना ते रुजू झालेले आहेत. या शाळेतील मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का? या शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तेथे कोणतेच रेकॉर्ड नाही. जोपर्यंत पूर्णवेळ शिक्षक मिळणार नाही. तोपर्यंत मुले येथून उठणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.