स्कूल बसखाली मूल चिरडूनही तक्रार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:30 AM2018-03-15T00:30:12+5:302018-03-15T00:31:48+5:30
वसमत शहरातील पाटी नगर भागात मंगळवारी एका स्कूलबसच्या चाकाखाली दोन वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहरातील पाटी नगर भागात मंगळवारी एका स्कूलबसच्या चाकाखाली दोन वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र या प्रकरणी मयताच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिलेली नसल्याने घटनेचा गुन्हा नोंद झाला नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
वसमतमध्ये अनेक खासगी शाळांच्या मालकांनी स्कूलबस द्वारे विद्यार्थी ने-आण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. आॅटो, व्हॅन, जीप, कार, पीकअप व मोठ्या गाड्यांना स्कूल बसचे नाव देवून विद्यार्थी कोंबून वाहतूक होत असते. शहरात अशी किती स्कुलबस धावतात, याचीही कोणाला माहिती नाही. अशाच एका स्कूलबसने मंगळवारी एका दोन वर्षीय बालकाला चिरडून ठार मारल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर वसमत पोलीस घटनास्थळी गेले. मात्र सदर प्रकरणी मयत बालकाच्या पालकांनी तक्रारच दिलेली नसल्याने गुन्ह्याची अद्याप नोंद नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दोन वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडून दोन दिवस झाले तरी प्रकरणाची नोंद न होणे, गुन्हा दाखल न होणे, तक्रार न देणे हा प्रकारही चिंता वाढवणारा आहे. परस्पर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही वृत्त आहे. आता तक्रार न आल्यास पोलीस सरकार पक्षातर्फे फिर्याद देतात की तक्रार नाही म्हणून दुर्लक्ष करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणी सपोनि आजमखान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरणाची तक्रारच आली नसल्याचे त्यांनी सांगून पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडताच घटनास्थळी भेट दिली. तक्रार देण्याची विनंतीही केली मात्र अद्याप तक्रार आलेली नाही. या प्रकरणी फिर्यादीने कधीही तक्रार दिली की कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.