शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांनी भरवली गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:55 PM2018-07-09T15:55:37+5:302018-07-09T15:57:25+5:30
शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली.
हिंगोली : तालुक्यातील भिंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग आठवीसाठी शिक्षक नाही. शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. त्यामुळे कार्यालयीन परिसरात काहीवेळ गोंधळ झाला होता.
तालुक्यातील भिंगी या गावी पहिली ते आठवीपर्यंत जि. प. प्राथमिक शाळा आहे. शाळेतील शिक्षकांची मंजूर संख्या आठ असून त्यापैकी एका शिक्षकाची हिंगोली येथे बदली झाली. त्यामुळे १८ जूनपासून आठव्या वर्गाला शिक्षकच नाही. शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे. यामुळे आज सकाळी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कूलूप ठोकत शाळा थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली.
यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांच्यासोबत गावकऱ्यांनी चर्चा केली. परंतु आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे आता भिंगी शाळेतील शिक्षकाची बदली हिंगोली डायट येथे करण्यात आली आहे. असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले. परंतु जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही, व तसे लेखी दिले जाणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून कोणीही हलणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळे कार्यालयीन परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी शाळेवर लवकरच तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल, तसेच रिक्तपदही भरले जाईल असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात विद्यार्थी, पं. स. सदस्य गंगाधर आगलावे, राहूल कांबळे, दिलीप कांबळे, सुरेश कांबळे, प्रकाश कु-हे, विलास कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.