दहावीच्या निकालास विलंब झाल्यास शाळाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:42+5:302021-06-30T04:19:42+5:30
हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून ...
हिंगोली : जिल्ह्यात दहावीच्या निकालासाठी शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. गतवर्षीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता आल्या नसल्याने आता निकालासाठी माहिती कुठून आणायची? हा सर्वांत मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे. या संभ्रमातच अनेक शाळांनी माहिती ऑनलाईन भरली नाही.
हिंगोली जिल्ह्यात दहावीला जवळपास १९ हजार विद्यार्थी होते. मात्र यंदा परीक्षा न घेताच मुलांना उत्तीर्ण करण्यासाठी मंडळाने फाॅर्म्युला दिला. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीही परीक्षा झाल्या नसल्याने काही शाळा संभ्रमात पडल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती कशी भरावी, यावर तोडगा सापडत नसल्याने काम थंडावल्याचे दिसत आहे.
गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी
गतवर्षीही परीक्षा झाल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग केले नव्हते. त्यामुळे कुठे मागच्या, तर कुठे चालू वर्षाच्या गुणांकनाचा प्रश्न आहे. तरीही विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता गुणांकन करून माहिती भरण्याचा प्रयत्न आहे.
-वसंत कावरखे, शिक्षक
दहावीचा निकाल देताना थोड्याबहुत अडचणी आल्या. मात्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी फेरतपासणी करून दोन दिवसांत कन्फर्म करणार आहोत.
-यादव नकलेकर, शिक्षक
२० टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला
जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी १९४०७
मुले १०२१४
मुली ९१९३
गेल्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे त्यापूर्वीच्या सत्रातील गुणांकनावर अवलंबून राहावे लागणार आहे. काही शाळांना हा निकालच भेटत नाही.
काही शाळांना गुणांकन करताना दिलेल्या फॉर्म्युल्यावरूनच संभ्रम आहे. दहावीचेही ऑनलाईन वर्ग न झाल्याने मूल्यमापन अंदाजे केले तर अडचणी येतील काय? ही भीती आहे.
यंदाच्या चाचण्या घेण्यास सांगितल्या. तोंडी परीक्षा व इतर बाबींसाठीही मुले भेटत नाहीत. फोनवरूनही मुलांशी संपर्क होत नाही. शाळेत येण्यासही मज्जाव आहे.
शाळांकडे पाठपुरावा करीत आहोत
दहावीच्या निकालासाठी शाळांनी ऑनलाईन माहिती भरायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. पाठपुरावा सुरूच असून माहिती न भरल्याने निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार राहतील.
- पी. बी. पावसे, शिक्षणाधिकारी