स्कूल व्हॅनचालकांना १४ महिन्यांपासून नाही काम ; काही जण भाजीपाला विकतात, तर काही शेतमजुरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:40+5:302021-05-20T04:31:40+5:30
कोरोना संसर्ग आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. जिल्ह्यातही १८ मे पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ९९० वर पोहोचली ...
कोरोना संसर्ग आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. जिल्ह्यातही १८ मे पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ९९० वर पोहोचली आहे. त्यापैकी १४१३० रुग्ण बरे झाले आहेत. तर ५४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये दिवसेंदिवस भर पडत असून, शासन प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून व्यवहारावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बाजारपेठेसह शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. यावर्षी मध्यंतरी माध्यमिक शाळा, महाविद्यालये काही दिवस सुरू होती. मात्र प्राथमिक शाळा अद्याप बंदच आहेत. त्यामुळे शाळांवर अवलंबवून असलेल्या स्कूल व्हॅन, बसचालकांवर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. जवळपास १४ महिन्यापासून हाताला काम नसल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. दरम्यान, अनेकांनी नवीन स्कूल व्हॅन, बस ही वाहने खरेदी केली आहेत; परंतु शाळा बंद असल्याने वाहने घरीच ठेवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनाचे हप्ते थकले आहेत. फायनान्सवाले घरी चकरा मारीत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी काही चालकांनी भाजीपाला विकणे पसंद केले. तसेच काही जण शेतमजुरी, बांधकाम कामगार म्हणून तर काही जण शेती करीत आहेत.
गजानन घुगे, स्कूल व्हॅनचालक
उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकतोय
शाळा बंद झाल्याने स्कूल व्हॅन बंद पडल्या आहेत. घरात पाच जण असून, सर्व भार माझ्यावर आहे. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीकाम करून भाजीपाला विक्री करतोय; मात्र यातून कुटुंबाचा भार पेलताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रामदास जगताप, स्कूल व्हॅन चालक
शेतीतून घर चालविण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे सर्व स्वप्नं धुळीस मिळाली आहेत. शाळा बंद असल्याने स्कूल व्हॅनही बंद ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. कुटुंबात ४ सदस्य असून, घर चालविण्यासाठी शेतात काम करतोय.
राजकुमार सरतापे, स्कूल व्हॅनचालक
मिळेल ते काम करतोय
शाळा बंद असल्याने व्हॅनही बंद ठेवाव्या लागत आहेत. घरात ४ सदस्य असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळेल ते काम करतोय. चांगल्या कामाच्या शोधात आहे.
अनिल सानप, स्कूल व्हॅनचालक.
शेतात काम करतोय
स्कूल व्हॅन बंद असल्याने स्वत:च्या शेतात काम करतोय. घरात ६ सदस्य असून, सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालविताना कसरत करावी लागत आहे. वाहनाचे हप्ते पेंडिंग असल्याने चिंता लागतेय.
गजानन काळे
किरायाचा छोटा ऑटोरिक्षा चालवतोय
स्कूल व्हॅन बंद ठेवावी लागत असल्याने घरातील ५ जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी छोटा ऑटोरिक्षा किरायाने घेऊन चालवित आहे. तो ही कडक निर्बंधामुळे कधी चालतो, कधी चालत नाही.
मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे -४५००
शहरातील एकूण बस, स्कूल व्हॅन - १००
शहरातील एकूण बस, स्कूल व्हॅनचालक - १००