लाच घेताना लिपिकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:26 AM2018-08-02T00:26:33+5:302018-08-02T00:26:48+5:30
रजामंजुरी आदेशाची संचिका आणि सेवापुस्तक कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी एका शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रजामंजुरी आदेशाची संचिका आणि सेवापुस्तक कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी एका शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
कळमनुरी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेच्या एक वर्ष १४६ दिवसांच्या रजा मंजुरीचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे होते.
रजा मंजुरीच्या आदेशाची संचिका आणि सेवापुस्तिका कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांनी शिक्षिकेच्या पतीकडे ४ हजार रुपये लाच मागितली होती. त्यामुळे शिक्षिकेच्या पतीने यांची तक्रार एसीबीच्या हिंगोली कार्यालयाकडे आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपये स्वीकारताना मुंडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली असून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले.