महावितरण कार्यालयास सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:15 AM2019-03-30T00:15:12+5:302019-03-30T00:15:45+5:30

गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे.

 Seal of the MSEDCL | महावितरण कार्यालयास सील

महावितरण कार्यालयास सील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ: गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे.
औंढा नागनाथ येथील महावितरण कार्यालयाकडे नगर पंचायतीचा अनेक वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. गत वीस वर्षांपासून अनेकवेळा कर भरण्याबाबत नोटिसा दिल्या. मात्र हे कार्यालय दाद देत नसल्यामुळे मागच्या आठवड्यात वसुलीसाठी लोकअदालतमध्ये प्रकरण ठेवले होते; परंतु कराची रक्कम जास्त आकारल्याचे कारण पुढे करीत महावितरणने कर भरणा करण्यास नकार दिला. त्यामुळे येथील नगर पंचायत कार्यालयाचे कर निरीक्षक उत्तम जाधव, प्रकाश तोटालू, विजय महामुने, हरिहर गवळी, नंदकिशोर डाखोरे, मारोती पांढरे, विष्णू रणखांबे, नागेश बुरकुले, अनिल नागरे आदींनी दुपारी २ च्या सुमारास महावितरण कार्यालयास सील ठोकले. मालमत्ता कराची रक्कम प्राप्त होईपर्यंत सील काढण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण कंपनीच्या उपकेंद्र व आॅपरेटर रुमलाच सील ठोकल्याने या ठिकाणी अगोदर विद्युत पुरवठा बंद केला. याच ठिकाणाहून औंढा शहर व तालुक्यातील ५२ गावांमध्ये विद्युत पुरवठा केला जातो. सील केल्यामुळे दुपारपासून विद्युत पुरवठा बंद आहे. ऐन उन्हाळ्यात ही कारवाई करण्यात आली. मार्चएण्डच्या नावाखाली दोन्ही कार्यालयाच्या वसुलीच्या नादात नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.
महावितरणचे उपअभियंता जैन यांना याबाबत संपर्क केला असता आमच्या रेकॉर्डनुसार ४ ते ५ लाखांची थकबाकी आहे. नगरपंचयतीने केलेल्या मागणीप्रमाणे कर भरण्यास असमर्थ असल्याची प्रतिक्रिया दिली. उन्हाळ्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे औंढा शहरवासियांना धारेवर धारल्याचे बोलले जात आहे.
नगरपंचायतीने महावितरणच्या कार्यालय व पॉवर स्टेशनला सील ठोकल्याने शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे शहरातील जनता उन्हामुळे त्रस्त झाली होती. करामुळे जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याने नगरपंचायत व महावितरण यांच्यात सायंकाळी ७ वाजता निर्णय झाला. कराची किती थकबाकी महावितरणकडे शिल्लक आहे, यावर शनिवारी तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सविता सतीश चौंढेकर यांनी दिली आहे.

Web Title:  Seal of the MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.