दुसऱ्या लाटेत इतर जिल्ह्यांतील २२० रुग्णांवर हिंगोलीत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:33+5:302021-07-26T04:27:33+5:30
हिंगोली जिल्हा हा आरोग्यविषयक सुविधांसाठी तुलनेने शेजारच्या मोठ्या जिल्ह्यांपेक्षा मागास आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या काळात चांगल्या सुविधा उभारण्यात ...
हिंगोली जिल्हा हा आरोग्यविषयक सुविधांसाठी तुलनेने शेजारच्या मोठ्या जिल्ह्यांपेक्षा मागास आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या काळात चांगल्या सुविधा उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या लाटेतही हिंगोली हा एकमेव जिल्हा होता, जेथे बेड अपुरे पडण्याची घटना घडली नाही. जेव्हा असे चित्र निर्माण होण्याची भीती दिसू लागली तेव्हा लागू केलेल्या कडक संचारबंदीने ही परिस्थिती टळली. बऱ्याच ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणापेक्षा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना थेट घरीच ठेवण्यात आले होते. मात्र हिंगोलीत तसे काही नव्हते. आढळलेला रुग्ण दाखल केला जात होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे एकूण १२ हजार ४३६ रुग्ण आढळून आले होते. यापैकी २२० रुग्ण हे इतर जिल्ह्यांतील असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जवळपास २ टक्के रुग्ण इतर जिल्ह्यांतील असल्याचे दिसून येत आहे.
परजिल्ह्यातून आलेल्या रुग्णांपैकी ९० जणांवर जिल्हा रुग्णालयात, ३८ जणांवर नवीन कोविड सेंटर औंढा रोड येथे, १३ जणांवर वसमत उपजिल्हा रुग्णालय, ३५ जणांवर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय तर ३४ जणांवर कवठा येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले आहे.