जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पाहून ग्रामस्थांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन
By यशवंत भीमराव परांडकर | Published: August 9, 2024 06:21 PM2024-08-09T18:21:13+5:302024-08-09T18:21:39+5:30
मागील दोन अडीच वर्षापासून जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून सदर काम निष्कृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
- मन्सूर अली
वटकळी (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलकुंभाचे काम निष्कृष्ट दर्जाचे होऊ लागल्याचे पाहून ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर जावून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. संबंधितांवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले.
सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील ग्रामस्थांनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. परंतु कोणताही अधिकारी लक्ष देवून काम व्यवस्थित करीत नाहीत, अशी ग्रामस्थांनी तक्रार आहे. ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर जावून आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
मागील दोन अडीच वर्षापासून जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून सदर काम निष्कृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेला निवेदनही दिले आहे. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी वटकळी येथे येऊन पाण्याच्या टाकीचे काम सुद्धा पहिले नाही. यासंबंधी कोणावरही कार्यवाही होत नाही हे पाहून ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. या आंदोलनात भारत शिंदे, रामेश्वर पोले, देवरा बोरुडे, गणेश डाखोरे, दिनेश उबाळे, शेषराव शिंदे, देवराव शिंदे, गजानन आंबोरे, राजू उबाळे आदींचा समावेश होता. यावेळी पोलिस निरीक्षक मारकळ, स्वामी, जमादार जाधव आदींची उपस्थिती होती.