आत्मविश्वास दांडगा ; जिल्ह्यातील पाच हजार ज्येष्ठांची कोरोनावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:44+5:302021-06-09T04:37:44+5:30
गत दीड वर्षापासून कोरोनाने सर्वत्र कहर माजविला आहे. रोज डझनाने रूग्ण आढळून येत आहेत. एवढे असताना कोरोना नियमांचे ...
गत दीड वर्षापासून कोरोनाने सर्वत्र कहर माजविला आहे. रोज डझनाने रूग्ण आढळून येत आहेत. एवढे असताना कोरोना नियमांचे पालन करत जिल्ह्यातील ज्येष्ठांनी कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे.
आजमितीस जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा ३. ५२ एवढा आहे. कोरोना नियमांचे पालन केले तर सर्वकाही शक्य आहे, हे ज्येष्ठांनाही दाखवून दिले आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यासंदर्भात वेळोवेळी सूचना देत आहे. मात्र अजूनही काहीजण सूचनांकडे दुर्लक्षच करीत आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. प्रथम ज्येष्ठांनी यात जास्त प्रमाणात पुढाकार घेतला आहे, हे मोठे ज्वलंत उदाहरण आहे. ज्येष्ठ सूचनांचे पालन करतात मग युवकांनी का करू नये? हाही यक्ष प्रश्न पुढे येतो.
युवकांनो ज्येष्ठांचे अनुकरण करा : आरोग्य विभाग
कोरोना महामारीचे तंतोतंत नियम पाळल्यास कोरोना जवळ पण येत नाही. बाजारात जातेवेळेस मास्क घालणे, खरेदी करतेवेळेस अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे एवढे सोपे नियम कोरोनाचे आहेत. पण काही युवकांना ते पाळणे शक्य होत नाही. पर्यायाने कोरोना अशा हलगर्जीपणा करणाऱ्यांना विळखा घालत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागही वेळोवेळी नियमांचे पालन करा, असे आवाहन करत आहे. जिल्ह्यातील पाच हजार ज्येष्ठांनी कोरोना नियमांचे पालन केले म्हणून त्यांना कोरोना महामारीवर विजय मिळविता आला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील ३३ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, काही जण अजूनही लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. कोरोना ओसरु लागला हे खरे असले तरी तो केव्हा विळखा घालेल हे सांगणे कठीण आहे. तेव्हा आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
- डाॅ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी, हिंगोली