खुल्यावर मांस विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:48+5:302021-02-11T04:31:48+5:30
शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा ...
शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे
हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. याठिकाणी प्लास्टिकसह अनेक हानिकारक वस्तू कचऱ्यात असून याचे सेवन शहरातील मोकाट जनावरे करीत आहे. यामुळे अनेक गायी दगावल्या जात असल्याचे दिसत आहे.
गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा, पिंपरखेड गावातील पथदिवे बंद आहेत. गावातील पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी वारंवार गावकऱ्यांतून करण्यात येत आहे. पण या मागणीकडे संबंधीतांनी लक्ष देण्यास दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तब्बल सहा महिन्यांपासून गाव अंधारात राहत आहे. यासाठी गावातील पथदिवे सुरू करावे अशी मागणी होत आहे.
पोस्ट ऑफीस - रेल्वे स्टेशन रस्त्यावर पोलीस गस्तीची मागणी
हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफीस रोड - रेल्वे स्टेशन रोडवर रात्रीच्या अनेक टवाळखोर आपल्या दुचाकीचा आवाज करुन नागरिकांना त्रास देत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक रुग्णालय असून टवाळखोरांच्या या प्रकारामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. यासाठी रात्री विनाकारण नागरिकांना त्रास देणाऱ्या या टवाळखोरांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हरभरा काढणीला आला वेग
कळमनुरी : तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजुर शेतशिवारात हरभराचे पिक काढणीस लागला आहे. या शेतीकामाने आता वेग धरला असून काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी उतार येत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी
औंढा नागनाथ : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना घरकूल मंजूर झालेले आहेत. पण नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक घरकूलधारकांचे घराचे स्वप्न अपूरे राहत आहे. सध्या लपून छपून वाळू मिळत असून या वाळूचा भाव गगनचुंबी असल्याने हा भाव सर्वसामान्यांना परवडेनासा आहे. यामुळे वाळू घाटांचा लिलाव व्हावा अशी मागणी घरकूल धारकांतून होत आहे.
पुलाचे काम जलदगतीने करण्याची मागणी
बासंबा : गावातील शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम मागील वर्षभरापासून होत आहे. हे बांधकाम कासवगतीने होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाताना या बांधकामामुळे अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहीत्य घेवून जाताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी या पुलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गतीरोधक बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजवळ नवीन सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्ता नवा असल्यामुळे अनेक वाहने या रस्त्यांवरुन भरधाव वेगाने धावत आहेत. या रस्त्याकाठी अनेक नागरिक राहत असून त्यांना रस्त्यावरुन ये जा करणे अवघड बनले आहे. यासाठी या रसत्यावर गतीरोधक बनवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
औंढा नागनाथ : शहरातील श्री नागनाथाच्या मंदिर परिरसरात मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत अनेक दुचाकीस्वार आपले वाहन रस्त्यात लावत आहे. यामुळे देवस्थानकडे व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर - वारंगा फाटा गावादरम्यान असणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे वाहनधारकांसह खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी परेशानी होत आहे. अनेकदा रुग्णांना या रस्त्यावरुन नेताना मोठा त्रास होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.