सेनगावच्या क्रीडा संकुलासाठी अजूनही उदासीनता कायम; २५ वर्षे उलटूनही हालचाल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:49 PM2018-01-17T15:49:51+5:302018-01-17T15:50:49+5:30
तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे.
सेनगाव (हिंगोली ) : तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे.
येथील तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. क्रिडा विकासाच्या धोरणाला चालना मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुकास्तरावर सुसज्य मैदान मिळावे, या करीता शासनस्तरावर तालुका क्रिडा संकुल उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सेनगाव तालुक्यात मात्र या क्रिडा विकास धोरणाला प्रशासनाच्या उदासिनतेचा फटका बसला आहे. सेनगाव तालुका निर्मिती होवून २५ वर्षे उलटले तरी तालुका क्रिडा संकुल उभे राहू शकले नाही. येथील क्रिडा संकुल उभारण्याकरीता राज्य शासनाने ३ वर्षापुर्वी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. या क्रिडा संकुलाकरीता एकूण ५ एकर जमिनीची गरज असून प्रशासन मागील १० वर्षापासून सेनगाव परिसरात जमिनीचा शोध घेत आहे.
सेनगाव परिसरात शासकीय गायरान जमिन उपलब्ध नाही, शासकीय दर कमी असल्याने संकुलाकरीता परिसरातील शेतकरी महागडी जमीन देण्यास नकार दर्शवित आहेत. अशा स्थितीत प्रशासनाकडून अन्य पर्यायाचा शोध घेताना दिसून येत नाही, वरिष्ठ अधिकारी, जबाबदार लोकप्रतिनिधींनी क्रिडा संकुलाकरीता कोणताही पाठपुरावा करताना दिसत नाही, मागील वर्षभरापासून जागेचा शोध घेणारी यंत्रणाच दिसत नाही. त्यामुळे २५ वर्षानंतरही तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.
कार्यालयास २० लाखांचा निधी प्राप्त
तालुका क्रिडा संकुलाकरीता येथील तहसील कार्यालयास २० लाख रुपयाचा निधीही प्राप्त झाला आहे. परंतु हा निधी आला तसाच पडून आहे. तालुका क्रिडा संकुलाच्या जागेकरीता, जमिन संपादनाकरीता महसूल प्रशासनाच्या वतीने जबाबदार अधिकार्याकडे भुसंपादनाची जबाबदारी दिली नसल्याने तसेच क्रिडा विभागाच्या अधिकार्यांकडूनही याचा पाठपुरवा होत नसल्याने तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न उदासिन धोरणात लटकत पडला असून तालुक्यातील खेळाडूंचे भविष्य मैदानाअभावी अंधकारमय बनले आहे.
अधिकार्यांचे दुर्लक्षतालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. विशेष म्हणजे याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्यांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.