सेनगाव येथे तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:39 PM2018-03-15T18:39:33+5:302018-03-15T18:40:18+5:30
शासनाच्या निराधार योजनेच्या काही प्रस्तावातील तलाठी प्रमाणपत्रावर बोगस स्वाक्षरी करून शिक्के मारल्याचे अर्ज पडताळणीत उघड झाले होते.
सेनगाव (हिंगोली ) : शासनाच्या निराधार योजनेच्या काही प्रस्तावातील तलाठी प्रमाणपत्रावर बोगस स्वाक्षरी करून शिक्के मारल्याचे अर्ज पडताळणीत उघड झाले होते. याप्रकरणी चौकशी करून वाघजाळी येथील एका जणाविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसील कार्यालयात १९ जानेवारीला दाखल निराधार लाभार्थी यांच्या प्रस्तावाची छाननी चालू करण्यात आली. यावेळी तालुक्यातील कहाकर बु सज्जा अर्तगत वाघजाळी येथील प्रयागबाई दत्ता मोरे, शोभाताई दत्ता मोरे, अखतर बी शेख नुर, शेख सयादिन शेख ईलाइ यांच्या प्रस्तावात तलाठी यांची संशयास्पद स्वाक्षरी व बनावट शिक्के वापरले असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात तहसीलदार वैशाली पाटील यांनी अधिक तपासणी केली असता प्रस्तावातील स्वाक्षरी व शिक्के बनावट स्पष्ट झाले. यावर याची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी तलाठ्याला दिले होते.
यानंतर सदर प्रस्ताव दाखल करणाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. यात त्यांनी सांगितले कि, ग्रामसेवक व तलाठी यांच्या स्वाक्षरी आणण्यासाठी गावातीलच संजय तांबीले यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आले होते. यावरून तांबीले याच्या विरोधात तलाठी डि. एस. इगळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.