दहा पैकी सातजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:56+5:302021-07-09T04:19:56+5:30
हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली ...
हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली जात आहे. शहरातील दहाजणांपैकी सातजणांना पत्नीचा मोबाईल नंबरही पाठ नसल्याने स्पष्ट झाले.
एकापेक्षा एक सरस मोबाईल आल्याने मोबाईलची साठवण क्षमताही अनेक पटीने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे नंबर सहज पाठ होत असत. आता मात्र एका मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या मोबाईल नंबरशिवाय इतरांचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्नही केला जात नाही. विशेष म्हणजे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे समोर आले आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक भागात गुरुवारी दहाजणांना त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर लक्षात आहे का याची विचारणा केली असता दहा पैकी सातजणांनी पत्नीचा मोबाईल नंबरच लक्षात नसल्याचे सांगितले. मोबाईल फोनमध्ये एकदा नंबर सेव्ह केल्यानंतर पुन्हा नंबर पाहण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकमत @ गांधी चौक
अ - अ व्यक्तीला पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे चार अंक सांगता आले, तर इतर अंक सांगता आले नाही.
ब - ब व्यक्तीला स्वत:चा नंबर सांगता आला. मात्र, पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नसल्याचे त्याने सांगितले.
क - या व्यक्तीने पत्नीकडे असलेल्या मोबाईल नंबरचे सुरुवातीचे दोन व शेवटचे चार अंक सांगितले. इतर अंक सांगताना मात्र अडखळत होता.
ड - या व्यक्तीने घरात एकच मोबाईल असल्याचे सांगितले. त्यामुळे हा नंबर सर्वांनाच पाठ असल्याचा दावाही त्याने केला.
ई- या व्यक्तीकडे असलेल्या दोन मोबाईल नंबरपैकी एकच नंबर पाठ होता. तसेच घरी सर्वांसाठी असलेल्या मोबाईलचा नंबर मात्र पाठ नव्हता.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
आता सर्वांकडेच स्मार्ट फोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच आपला मोबाईल नंबर सोडून इतरांचा नंबर लक्षात राहत नाही. गुरुवारी एकास स्वत:चा सोडून इतर कोणता नंबर पाठ आहे, असे विचारले असता त्याच्या बॉसचा नंबर लक्षात असल्याचे त्याने सांगितले.
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
माझ्याकडे स्मार्ट फोन आहे. माझा नंबर पाठ असला तरी मिस्टरांचा नंबर मात्र पाठ नाही. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याने पाठ करण्याची आवश्यकताच भासली नाही.
- एक गृहणी
मागील दोन वर्षांपासून मोबाईल वापरते. तसेच मिस्टरांकडे व मुलांकडेही मोबाईल आहे. परंतु, त्यापैकी एकाचाही नंबर पाठ नाही. मोबाईलमध्ये नाव टाकल्यास लगेच फोन लावता येतो. नंबर लक्षात ठेवण्याची गरजच नाही.
- एक गृहिणी
लहान मुलांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
शाळेत आई-बाबा दोघांचाही नंबर दिला आहे. तसेच शाळेच्या डायरीवर नंबर लिहून ठेवला होता. त्यामुळे दोघांचेही नंबर पाठ केले. आता शाळा सुरू नसल्या तरी नंबर मात्र पाठ आहे.
- शर्वरी कावरखे
माझ्याकडे मोबाईल नाही. बाबांना सारखा फोन लावावा लागतो. त्यामुळे बाबांचा मोबाईल नंबर पाठ झाला. तसेच अंकलचा नंबरही पाठ आहे.
-पीयूष भालेराव
व्यसनाधीनता, मानसिक आजार, फिटचा आजार, आदींमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच ६० वर्षांनंतर काही गोष्टी लक्षात राहत नाहीत.
- डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली