बंडखोर आमदार संतोष बांगर यांना धक्का; स्वत: उद्धव ठाकरे मैदानात, राजकारण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:18 PM2022-07-12T17:18:50+5:302022-07-12T17:18:56+5:30
संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे.
हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. याप्रकरणी पक्षाकडून त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याला विरोध करत आज मुंबईत आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
संतोष बांगर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. यावेळी भर पावसात संतोष बांगर यांनी समर्थकांना संबोधित केलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संतोष बांगर यांच्या समर्थकांची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे.
संतोष बांगर यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मन वळवण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहापैकी पाच तालुकाप्रमुख आणि सर्व उपजिल्हाप्रमुख, तसंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे स्वत: हे हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांनी अनेक वेळा फोनवरून शिवसैनिक व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासोबत संवाद देखील साधला होता. त्यामुळे संतोष बांगर यांच्या बंडानंतरही पक्षाची पडझड रोखण्यात उद्धव ठाकरे यांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पुढील काही दिवसांत शिवसेनेचा नवीन जिल्हाप्रमुखही जाहीर करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संतोष बांगर यांचं कौतुक-
शिवसेना संपवण्याचं काम गेल्या अडीच वर्षात होत होतं. पण आता एकटा एकनाथ शिंदे नव्हे तर तुम्ही सर्व मुख्यमंत्री आहात. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे एकाही शिवसैनिकाचा बाल बाका करण्याची हिंमत कुणी करणार नाही. संतोष बांगर यांच्या जिल्ह्यातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.