शिवसेना म्हणाली, कर्जमाफीच्या याद्या न लावणा-या ' भाजप सरकार ' चा दशक्रियाविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:55 PM2017-08-22T16:55:07+5:302017-08-22T16:59:54+5:30
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणा-या शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतासमोर रडापड केली. यानंतर या प्रेताची दशक्रियाविधी करून शिवसैनिकांनी मुंडण करत आंदोलन केले.
हिंगोली, दि. २२ : कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणा-या शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतासमोर रडापड केली. यानंतर या प्रेताची दशक्रियाविधी करून शिवसैनिकांनी मुंडण करत आंदोलन केले.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेताच्या नावाने रडापड केली. ढोल वाजवा आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच बँकेसमोर कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या लावल्या नाहीत. यामुळे आज भाजप सरकारचा दशक्रियाविधी घालत मुंडण आंदोलन केले.
यांनतर जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हेत्रेवार यांची आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी म्हेत्रेवार यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत माहिती देऊन जिल्ह्यात ६९६ केंद्रांवरून कर्जमाफीसाठीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा कमी रक्कम थकबाकी असलेले ६६०२५ थकबाकीदार असल्याचे सांगितले. हि रक्कम ३६२ कोटी रुपयांची असल्याचे ते म्हणाले. तर त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या खातेदारांची संख्या १0 हजार ६८७ असून रक्कम २९३ कोटी एवढी आहे. हे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास उर्वरित हप्ते भरून ते अर्ज भरू शकतात, असेही ते म्हणाले. यासोबतच एका कुटुंबात एकालाच कर्जमाफीत लाभ मिळू शकते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर, युवासेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, भानुदास जाधव, गोपू पाटील, आनंदराव जगताप आदींसह मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांचा सहभाग होता.