‘टोकाई’ कारखान्यावर पुन्हा शिवाजीराव जाधवांचे वर्चस्व; पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2023 07:04 PM2023-07-04T19:04:28+5:302023-07-04T19:04:50+5:30
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांची ऊस बिले थकली, ऊस गाळपासाठी गेला नाही यासह इतर मुद्द्यांवर प्रचार रंगला होता
- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. शिवाजीराव जाधव यांच्या शेतकरी विकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवला. तर टोकाई शेतकरी विकास पॅनलला एक जागेवर समाधान मानावे लागले. अटीतटीच्या निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी ॲड. शिवाजीराव जाधव यांच्यावर विश्वास ठेवत ‘टोकाई’ पुन्हा त्यांच्या ताब्यात दिला.
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांची ऊस बिले थकली, ऊस गाळपासाठी गेला नाही यासह इतर मुद्द्यांवर प्रचार रंगात आला होता. दरम्यान, निवडणुकीत प्रचार आरोप-प्रत्यारोपही झाले. २ जुलै रोजी झालेल्या मतदानाची ४ जुलै रोजी जुने तहसील कार्यालय परिसरात असलेल्या धान्य गोडावूनमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. १७ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात उभे होते. निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात टोकाई शेतकरी विकास पॅनलचे खोब्राजी नरवाडे यांनी २० मते घेत विजय मिळविला. तर ॲड. शिवाजीराव जाधव शेतकरी विकास पॅनलचे विठ्ठल भोसले यांना १४ मते पडली असून ते पराभूत झाले.
कुरुंदा गटातील उमेदवार मनोज कन्नेवार (मते २७९०), शिवाजी इंगोले (२८८७), गिरगाव गट सुनील बागल (२६८२), रावसाहेब कऱ्हाळे (२८०३), विलास नादरे (२७८८), कौठा गट मुंजाजीराव जाधव (२५५०), ॲड. शिवाजीराव जाधव (२७६८), दांडेगाव गट शिवाजी सवंडकर (२८४६), जगदेवराव साळुंके (२७४७), कोंढूर गट साहेबराव पतंगे (२९१६), गजानन जाधव (३२०८), अनु. जाती जमाती रणधीर तेलगोटे (२९७२), महिला राखीव -अर्चना सिद्धेवार (२७००), बायनाबाई कऱ्हाळे (२६९८), इतर मागास प्रवर्ग -देवानंद नरवाडे (२५८१), विभजाविमाप्र- विश्वनाथ जमरे (२९३२) हे विजयी झाले आहेत.
निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार...
मुंजाजी इंगोले, आंबादास भोसले, सुनील नादरे, विजय नरवाडे, अनिरुद्ध कऱ्हाळे, अशोक खराटे, साहेबराव जाधव, प्रभाकर जगताप, अच्युत नादरे, कुंडलीक देशमुख, निळकंठ शिंदे, सुरेश नागरे, कोंडबा लोखंडे, इंदुमती देशमुख, अन्नपूर्णा दासरे, अश्विनी खराटे, कुसूम गोरे, बबनराव कदम, गणपत तागडे, संभाजी बेंडे हे उमेदवार पराभूत झाले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत...
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खलाळ, तहसिलदार शारदा दळवी, प्रभारी सहायक निबंधक किशोर धुतमल यांच्या नेतृत्वात निवडणुक मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडली, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर कदम यांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता,
पिता-पुत्राने मारली बाजी...
टोकाई शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जिपचे माजी उपाध्यक्ष अंबादासराव भोसले व ॲड. शिवाजीराव जाधव शेतकरी विकास पॅनलचे विठ्ठल भोसले हे दोघे भाऊ प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार होते. दोघांचाही पराभव झाला, तसेच टोकाई शेतकरी विकास पॅनलमध्ये इंदुबाई देशमुख व त्यांचे पती पुंडलिक देशमुख या पती-पत्नीचा पराभव झाला. पुत्र ॲड. शिवाजीराव जाधव व त्यांचे वडिल मुंजाजीराव जाधव यांचा विजय झाला तर बबनराव कदम यांचा अवघ्या ३० मतांनी पराभव झाला.