'हिंदू बांधवांनो' शब्द टाळल्याने टीका; पलटवार करत उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 05:15 PM2024-03-18T17:15:24+5:302024-03-18T17:19:31+5:30
भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेला उद्धव यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.
Shivsena Uddhav Thackeray Speech ( Marathi News ) : विरोधकांच्या इंडिया आघाडीची सभा काल राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पार पडली. या सभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मात्र उद्धव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' अशी न करता 'माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो' अशी केली. या मुद्द्यावरून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेला उद्धव यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
"मी काल माझ्या भाषणाची सुरुवात 'माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो' अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही 'देशभक्त' नाही का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्लाही चढवला आहे.
"शिवसेनेचं प्रेम आणि मिंध्यांचं भाडोत्री प्रेम यात जमीन आस्मानाचा फरक आहे. शिवसेना हा एक निखारा आहे. शिवसेना कळणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. भाजपला घरफोडीचं एक लायसन्स द्या, आणि पक्ष चिन्ह कमळ सोडून हातोडा द्या," असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता अच्छे दिन नाही, सच्चे दिन येणार, असा टोलाही त्यांना भाजपला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले होते बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. "आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही," अशी टीका बावनकुळे यांनी केली होती.