शिक्षण क्षेत्रात खळबळ; मुख्याध्यापक ४० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 04:34 PM2023-05-11T16:34:09+5:302023-05-11T16:36:02+5:30
एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई केली.
- इस्माईल जहागिरदार
वसमत: पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहत येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी ३ वाजता रंगेहात पकडले. भगवान लहाने असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली.
वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहतीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात तक्रारदार हे अनुकंपावर नोकरीवर आहेत. त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यासाठी मुख्याध्यापक भगवान लहाने यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी करून आज शाळेच्या परिसरात सापळा लावला.
दुपारी ३ वाजेदरम्यान मुख्याध्यापक भगवान लहाने यास विद्यालयाच्या परिसरात ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. मुख्याध्यापक लहाने चतुर्भुज होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सुळीकर तसेच इतर कर्मचारी उशिरापर्यंत मुख्याध्यापकाची चौकशी करत होते.