खळबळजन! शिवारात आढळेल्या मृतदेहाच्या अंतर्वस्त्रामध्ये सापडली चिठ्ठी, सुनेसह चौघांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:18 PM2022-12-29T12:18:08+5:302022-12-29T12:18:42+5:30
भोकर तालुक्यातील एकाचा मृतदेह हिंगोलीतील रामेश्वरतांडा शिवारात आढळला
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील एका व्यक्तीचा मृतदेह रामेश्वरतांडा शिवारात २८ डिसेंबर रोजी सकाळी आढळून आला. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये चिठ्ठी आढळली असून, आपल्या मृत्यूस चौघेजण कारणीभूत असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्याशिवाय त्याच्या अंगावरील बनियनवरही तोच संदेश लिहिला आहे. या प्रकरणात पोलिसही चक्रावले आहेत. ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न पडला असून, रात्री उशिरापर्यंत या प्रश्नाचा शोध सुरू होता.
रामेश्वर तांडा शिवारात सकाळी एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. बाळापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, जमादार शेख जावेद घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सदर गृहस्थ मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या शेजारी विषारी औषधाची बॉटलही सापडली. सदर व्यक्ती कोण? याचा तपास केला असता त्याची ओळख पोलिसांनी पटवली असून त्याचे नाव अप्पाराव रामा राठोड (रा. मसलगाव कासारपेठ तांडा, ता. भोकर, जिल्हा नांदेड) असे असल्याचे आढळले.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी मृतदेहाच्या अंतवस्त्रात एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये सुनेसह चौघांची नावे लिहिली असून त्यांच्या त्रासास कंटाळलो असून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बनियनवरही हाताने लिहिले असून आपण चौघांच्या त्रासाने कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बनियनच्या दोन्ही बाजूने सरळ हाताने लिहिलेला संदेश असल्याने दोन्ही हाताने त्याला कसे लिहिता येईल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मृतास दोन मुले आणि तीन मुली असून सर्वांची लग्ने झाली आहेत.
त्याचा मोठा मुलगा उदगीर येथे अभियंता असून रामेश्वरतांडा येथील मुलीशी त्याचे लग्न झाले आहे. त्या मुलीचे आई-वडील, भाऊ आणि सून असलेल्या तिचेही नाव चिठ्ठीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृताच्या हाताला, पायाला जखमा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री आठ वाजेपर्यंत उत्तरीय तपासणीलाही सुरुवात झाली नव्हती.