धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 06:02 PM2021-12-25T18:02:10+5:302021-12-25T18:05:14+5:30
बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नांतील अल्पवयीन मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात
हिंगोली : महागड्या मोबाईल घेण्यासाठी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने चक्क बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंगोली शहराजवळील गंगानगर कारवाडी भागात २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
हिंगोली शहराजवळील गंगानगर, कारवाडी भागात नांदेड रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेत ग्राहकांची संख्याही मोठी आहे. २४ डिसेंबरच्या रात्री बँकेच्या पाठिमागील बाजूस भिंत फोडण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी बँकेकडे धाव घेतली. यावेळी बँक फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले. याच वेळी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी या भागत गस्त घालत होते. त्यांनीही बँकेकडे धाव घेतली.
दरम्यान, नागरिक व पोलीस येत असल्याचे दिसताच चोरट्याने येथून पळ काढला. तसेच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एन. मळघने, उप निरीक्षक अच्युत मुपडे, पोलीस हवालदार जी.के. पोकळे, रविकांत हारकाळ, आकाश पंडितकर आदींच्या पथकाने धाव घेत चोरट्याचा शोध सुरू केला.
यावेळी चोरटा सावरखेडा गावाकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे संपर्क साधला. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजूरांनी त्यास पकडून ठेवले. त्यानंतर चोरट्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी अधिक चौकशी केली चोरटा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने मोबाईलसाठी पैसे नसल्यामुळे चोरीचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याप्रकरणी कुलभूषन देशमुख यांच्या फिर्यादीवरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलीस हवालदार जी.के. पोकळे तपास करीत आहेत.
आईसोबत येत बँकेची केली पाहणी
हिंगोली तालुक्यातील टाकळी (टीएन) येथील अल्पवयीन मुलगा आहे. तो नांदेड जिल्ह्यातील शाळेत शिक्षण घेतो. शिष्यवृत्तीसाठी खाते काढण्यासाठी काही दिवसांपूर्वीच तो आई सोबत बँकेत आला होता. यावेळी बँकेत खूप पैसे असल्याची खात्री त्याला पटली. त्यामुळे किमती मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने बँकेवर डल्ला मारण्याचा निर्णय घेतला. २५ व २६ डिसेंबर अशी दोन दिवस सुट्टी असल्याने बँकेकडे कोणीही फिरकणार नाही. हा अंदाज घेऊन २४ डिसेंबरच्या रात्री तो लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या मागे लपला होता.