धक्कादायक ! माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या रेशन दुकानात काळा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:56 PM2020-08-07T15:56:46+5:302020-08-07T15:58:39+5:30
आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता.
सेनगाव (जि. हिंगोली) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे यांच्या रेशन दुकानावर धाड टाकली. या धाडीत ११२ क्विंटल धान्यासह १७ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सेनगाव पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी विशाल खाडे, अमजद पठाण व स. अजहर स. नूर यांना ताब्यात घेतले.
सपोनि उमाकांत चिंचोळकर, पोउपनि शिवम घेवारे, पोउपनि किशोर पोटे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेशन दुकानातील धान्य विक्रीसाठी नेत असताना धाड टाकत काळ्या बाजारात तांदूळ, गहू, तुरदाळ, हरभरादाळ धान्य चढ्या दराने विक्री करण्याचा उद्देशाने पोत्याची पलटी मारुन ट्रकमध्ये (क्र. एम.एच.३७ - १६०७) टाकत असताना रंगेहाथ पकडले.
यावेळी पोलिसांनी रेशनचे धान्य, रिकामे पोते, रास्त भाव दुकानाच्या आॅनलाईन थम मशीन, असा एकूण ११२ क्विंटल धान्य, एक ट्रक, मोटारसायकल आदी एकूण १७ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोउपनि शिवसांंब घेवारे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजिनी खाडे यांच्यासह नातू विशाल विलास खाडे, अमजद खाँ शेरखाँ पठाण (रा.सेनगाव), सय्यद अझर सय्यद नूर (रा.रिसोड, चालक), समीर खान, सय्यद आझम सय्यद नूर, ट्रकमालक श्याम बाहेती (रा. वाशिम) व सरोजिनी खाडे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याआधीही पोलिसांची कारवाई
आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्या नातेवाईकांवर कारवाई करीत ५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. यासंबंधी पोलिसांनी खाडे यांचा मुलगा सतीश खाडेसह अन्य दोघांवर कारवाई केली होती. ही कारवाई ताजी असताना पुन्हा एकदा माजी अध्यक्षा खाडे यांच्या रेशन दुकानावरीन तांदूळ, गहू, हरभरा, तूरडाळ हा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बुधवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सलग कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.