धक्कादायक ! पेरणीला पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:13 IST2020-07-23T20:12:23+5:302020-07-23T20:13:48+5:30
झुनझुनवाडी येथील अजय पवार या शेतकऱ्याने वडिलोपार्जित असलेल्या एका एकर शेतामध्ये सोयाबीनची दुबार पेरणी करूनही पेरलेले न उगविले नाही

धक्कादायक ! पेरणीला पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
डोंगरकडा (जि. हिंगोली) : कोरोना संकटात सध्या हाताला काम नाही, शेतात दुबार पेरणी करूनही पेरलेले सोयाबीन उगवले नाही. तिबार पेरणीसाठी बँक दारात उभी करायला तयार नाही, यामुळे निराश झालेल्या झुनझुनवाडी येथील अजय बापूराव पवार (२४) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २२ जुलै रोजी घडली.
झुनझुनवाडी येथील अजय पवार या शेतकऱ्याने वडिलोपार्जित असलेल्या एका एकर शेतामध्ये सोयाबीनची दुबार पेरणी करूनही पेरलेले न उगविले नाही, दुकानदार व इतर लोकांचे देणे कशाने फेडावे या विवंचनेत तो २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतात जातो म्हणून घरी सांगून गेला. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झुनझुनवाडी शिवारातील जंगलामध्ये एका झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत तो आढळला. त्यांचे नातलग सुदाम शंकर पवार याने गावातील सरपंच, व त्यांच्या घरी घटनेची माहिती दिली. त्यानंतर जमादार शेख बाबर, व प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉ. विनोद आतकुरकर यांनी शवविच्छेदन केले. आत्महत्येबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग हे करीत आहेत.
बँकेकडून मिळाली उडवाउडवीची उत्तरे
अजय पवार हे डोंगरकडा येथील बँकेत कर्ज मागण्यासाठी गेले होते, तर या बँकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना सांगितले की, तुमचे गाव वारंगा येथील बँकेला जोडले आहे. वारंगा येथील बँकेत कर्जासाठी विचारले असता बँकेतील अधिकाऱ्यांनी आमच्याकडे नोंद आली नाही, असे उत्तर देऊन हात वर केले.