धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 06:44 PM2020-11-27T18:44:25+5:302020-11-27T18:47:07+5:30
सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता.
वसमत : तालुक्यातील सातेफळ येथे सामायिक विहिरीवरून भिजवणीसाठी पाणी घेण्याच्या वादातून २२ नोव्हेंबर रोजी खून झाला. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला हट्टा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक झाली असून न्यायालयाने आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबर रोजी मोटर लावून भिजवण करत असलेल्या शेतकरी पंजाब व्यंकटराव अंभोरे (वय ३२) यांच्या डोक्यात लाकडाने मारून ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर हे प्रकरण आपसात तडजोडीने मिटविण्याचाही प्रयत्न झाला.
अडीच एकर शेतजमिनीची रजिस्ट्री करून देण्यावर तडजोडीची चर्चाही होती. त्यातून खून प्रकरणाची तक्रार हट्टा ठाण्यात दोन दिवस देण्यात आली नाही. तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर २५ रोजी हट्टा ठाण्यात खून प्रकरणाची तक्रार देण्यात आली. मयताची पत्नी विद्या पंजाब अंभोरेच्या तक्रारीवरून आदिनाथ अंभोरे, श्रीधर अंभोरे या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यांना न्यायालयासमाेर उभे केले असता, २९ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सामायिक विहिरीवर मोटार लावण्याच्या कारणावरून रागाच्या भरात एकाचा खून करण्याचा प्रकार घडला. मात्र तो दडपून टाकण्याचाही प्रकार झाला होता. तडजोड न झाल्याने ही बाब उजेडात आली आहे.
...अन् विहिरीसह जमीन देण्याची तयारी
भावकीतील भांडणे व वाद किती विकोपाला जातात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दोन कुटुंबांतील सामायिक विहिरीला पाणी एवढे आहे की, दोन्ही मोटारी लावल्या तरी उपसा हाेत नाही. असे असले तरी भावकीत वादावाद व एकमेकांचा द्वेष यावरून वाद हाेत असे. या घटनेच्या एक दिवस अगोदरच दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. ग्रामस्थांनी प्रकरण मिटविले होते. दुसऱ्या दिवशी मोटार लावल्याने राग अनावर झाल्याने डोक्यात लाकडाने मारून खुनाची घटना घडली. याप्रकरणी तडजाेडीसाठी विहिरीसह दोन एकर दोन गुंठे जमीन मयताच्या नातेवाईकाला रजिस्ट्री करून देण्याची तयारी झाली असल्याचे वृत्त आहे. मात्र रजिस्ट्री करून दिल्यानंतरही प्रकरण मिटेल का नाही, यावरून पुन्हा मतभेद झाल्याने प्रकरण पोलिसांत गेले. ‘शेत गेले तरी हरकत नाही, पण धुरा गेला नाही पाहिजे’ या प्रमाणेच पाण्यासाठी खून झाल्यानंतर विहिरीवर पाणी सोडण्याची वेळ आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. भाऊबंदकीतील वाद विकोपाला जाऊ नये, याचाच धडा ही घटना देत आहे.