औंढ्यात दुकान फोडून २ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:08 AM2018-10-02T01:08:43+5:302018-10-02T01:09:02+5:30
येथील हिंगोली राज्य मार्गावर असलेल्या इलेक्ट्रिकल्स् हे दुकान फोडून त्यामधून २ लाख रुपयांच्या वर कॉपर धातूची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी २ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्हीमार्फत पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील हिंगोली राज्य मार्गावर असलेल्या इलेक्ट्रिकल्स् हे दुकान फोडून त्यामधून २ लाख रुपयांच्या वर कॉपर धातूची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी २ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्हीमार्फत पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
औंढा नागनाथ येथे विजय अंकुश गरड यांचे राज्य रस्त्यालगत शिवशंकर इलेक्ट्रीकल व मशिनरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे दोन्ही कुलूप तोडलेले आढळून आले. आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना दुकानातील महागड्या कॉपरच्या तारा व इतर साहत्यासह गल्ल्यातील नगदी १६ हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. जवळपास ९ क्विंटल कॉपर चोरीस गेल्याचे उघड झाले असून, त्यांची किंमत २ लाखांच्या वर आहे. त्यामुळे विजय गरड यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबतची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी चोरट्यांनी तत्काळ माग घेण्यासाठी हिंगोली येथील ठसेतज्ज्ञांच्या पथकास पाचारण केले. या दुकानात पंचनामा करून ठसे घेण्यात आले आहेत.
या दुकानाच्या आजूबाजूच्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्येही बाब कैद झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली असून, पोनि वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल बहुरे तपास करीत आहेत. या आठवड्यात चोरीची ही दुसरी घटना असल्याने शहरातील व्यापाऱ्यांत घबराट निर्माण झाली आहे.