कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संचारबंदीतही मांडले दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:29 AM2021-04-21T04:29:55+5:302021-04-21T04:29:55+5:30
हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. असे असताना शहरातील एका माठ ...
हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. असे असताना शहरातील एका माठ विक्रेत्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चक्क संचारबंदीतही दुकान मांडले. दुपारी ४ वाजेपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याच्या पदरात दोनशे पडले.
कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याचे पाहून राज्य शासनाने १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाने गत दीड वर्षापासून छळ मांडला आहे. एप्रिल आणि मे हे दोनच महिने कुंभार व्यावसायिकांसाठी उदरनिर्वासाठीचे साधन आहे. परंतु, याच महिन्यात कोरोनाने कहर मांडला आहे. त्यामुळे याही महिन्यात माठ विक्री होत नाही. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने घरात अन्नाचा कणही नाही. विशेष घरात लहान-मोठे सहा-सात सदस्य आहेत. त्यांचे पोट कसे भरावे, हा प्रश्न कुंभार व्यावसायिकापुढे पडला आहे. २० एप्रिलपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे शासन जाहीर केले. हे पाहून एका माठ व्यावसायिकानेही शहरातील गांधी चौकात १० ते १२ माठ आणून दुकान मांडले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यत त्याने ग्राहकांची प्रतीक्षा केली. संचारबंदीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. एक-दोन ग्राहकांनी माठांची किंमतही विचारली; पण माठ विकत घेतला नाही. दुपारी ४ वाजेपर्यंत दुकान मांडल्यानंतर घरचा रस्ता धरण्याचे ठरिवले. माठांची आवराआवर केली. निघतेवेळी का होईना २०० रुपयांचा माठ विक्री झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
कोरोना महामारीने दीड वर्षापासून छळ मांडला आहे. बाहेरगावीही माठ विक्री करायला जाता येत नाही. कोरोना आधी बाहेरगावी माठ विक्री करायला जात होतो. यावेळेस तेही शक्य होत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घराचा गाडा माठ विक्रीवरच आहे. परंतु, तोही कोरोनाने हिसकावून घेतला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी.
- राधेश्याम पेरिया, माठ विक्रेता
फोटो नंबर ३