दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:45+5:302021-06-09T04:37:45+5:30
हिंगोली : कोरोना नियमांचे पालन करत, शहरातील दुकानदारांनी कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी ...
हिंगोली : कोरोना नियमांचे पालन करत, शहरातील दुकानदारांनी कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही, शहरातील अनेक दुकानदारांनी अजूनही कोरोना चाचण्या केलेल्या नाहीत. येत्या १४ जूनपूर्वी शहरातील छोटे - मोठे दुकानदार, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी आरटीपीसीआर, अँटिजन या चाचण्यांसोबत लसीकरण करुन घ्यावे. यानंतर या सर्वांनी अहवाल जवळ बाळगून ठेवणेही गरजेचे असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी कळविले आहे.
८ जून रोजी गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक, अकोला रोड, बसस्थानक परिसर, कापड गल्ली तसेच शहरातील सर्वच नगरांमध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले. ज्यांनी लसीकरण व कोरोना चाचणी केली नाही, अशांवर कोरोना नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
दोन दिवस केले जाणार आवाहन
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्वच भागात ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. तेव्हा दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांनी कोरोना सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही केले.